उन्हाच्या झळा मध्ये जागृत कष्टकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
चौक,
सुस्त झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ४४ अंश तापमानात खालापूर तहसील कार्यालयावर जागृत कष्टकरी संघटनेने मोर्चा काढला, यावेळी उन्हाच्या लाही पेक्षा घोषणांचे चटके लागत होते.
भोंगे, गोमांस,हीजाब,लव जिहाद,मन्दिर-मज्जीद याकडे गुरफटून ठेऊन आदिवासी व सामान्य जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे,असा आरोप जागृत संघटनेच्या नॅन्सीताई गायकवाड यांनी केला आहे.आज भरदुपारी अंगाची काहिली होत असताना अनेक आदिवासी महिला-पुरुष खालापूर फाटा पासून तहसीलदार कार्यालयापर्यंत शांततेत निघालेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर तहसिल कार्यालयाच्या आवारात झाल्यावर नॅन्सीताई गायकवाड बोलत होत्या.
आदिवासी यांना खराब धान्य दिले जाते,विभक्त कार्ड देताना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंत्योदय कार्ड द्यावे,रेशनकार्ड ऑन लाईन झाले अगर नाही तरीही धान्य द्यावे,
रेशनची पावती मिळावी,खाजगी व शासकीय जमिनीवरील घरांना घरपट्टी द्यावी,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी ची कामे सुरू करावीत,
वनहक्कांचे दावे निकाली काढावे,दळी जमिनीची मोजणी करून वहिवाट नुसार ७/१२ उतारा मिळावा आशा ११ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी केशव वाघमारे, अनिल सोनवणे,वसंत पवार उपस्थित होते.तहसीलदार आयुब तांबोळी हे भर उन्हात मोर्चाला सामोरे गेले,तत्पूर्वी त्यांनी चहा-पाणी यांची व्यवस्था केली,
व सभा संपल्या नंतर आदिवासी मोर्चेकरी यांना जेवणाची सोय देखील केली,हे खालापूर च्या इतिहासात प्रथम घडले.