खोपोली । तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत हद्दीत अनेक खड़ी मशीन असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या खड़ी तयार करण्यासाठी डोंगराळ गावाजवळील जमिनीला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. यातील आंजरुण गावालगत असणाऱ्या सी.बी. सिंग खडी मशीनमधील ब्लास्टिंगमुळे माणकीवली कार्यालयाला तडे गेले. ग्रामपंचायत
सी.बी. सिंग खडी मशीनच्या कारभाराबाबत येथील नागरिक संताप व्यक्त करत असून या मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर घरत आहे. खडी मशीनच्या ब्लास्टिंगमुळे गेलेल्या तड्यासंदर्भात ग्रामपंचायतीने वेळोवेळी निवेदन दिले असता खडी मशीन मालक या निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याचे याठिकाणी पहावयास मिळत आहे.
खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने तालुक्यात चर्चेचा विषय बनत असताना ही ग्रामपंचायत पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. या ग्रामपंचायतीला खडी मशीच्या ब्लास्टिंगमुळे तडे गेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व भिंतींना मोठमोठाले तडे गेल्याचे पहावयास मिळत आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या माणकिवली ग्रामपंचायत नवीन कार्यालयासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर याठिकाणी मोठ्या दिमाखात ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यात आले.
काही महिन्यांतच या कार्यालयाला ब्लास्टिंगमुळे तडे गेल्याने येथील ग्रामपंचायत प्रशासनाने सी.बी. सिंग खडीमशीन मालकाला यासंदर्भात निवेदन देत आपल्या खडी मशीनमधील ब्लास्टिंगमुळे कार्यालयाला तडे गेल्याची कल्पना दिली. मात्र खडी मशीन मालक याकडे कानाडोळा करत दररोज दिवसाढवळ्या ब्लास्टिंग करत आहे. त्यामुळेदिवसेंदिवस अधिकच ग्रामपंचायत कार्यालयाला तडे जात असल्याने खडी मशीन मालकाच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक झाले आहे. दरम्यान, या खडीमशीन मालकावर महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सरपंच बाळकृष्ण वाघमारे यांनी केली आहे.