जन्म. २२ जून १९३५
कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे.
कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे!
गेल्या अर्धशतकात नाटक-चित्रपट जाहिराती, तसेच मुखपृष्ठे यांना कमल शेडगे यांच्या अक्षरांमुळे दृश्यार्थ लाभला. रंगभूमीवर प्रत्येक वर्षी अंदाजे ३५ ते ४० नाटकं येत असतात. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याकरता आता सोशल नेटवर्कसहित अनेक माध्यमे असली तरी आजही नाट्यव्यवसायात वर्तमानपत्रातील जाहिरात हेच प्रमुख माध्यम मानलं जातं. नाटकाच्या या वर्तमानपत्रातील जाहिरातींचे डिझाइन तयार करणारे जे डिझाइनर्स आहेत, त्यात प्रमुख नाव होते, कमल शेडगे यांचे.
कमल शेडगे १९५५ पासून टाइम्स ऑफ इंडियामध्ये कला विभागात काम करू लागले. त्या वेळी टाइम्समध्ये त्यांच्यासोबत मराठी व्यावसायिक नाटकांचे नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर हेही नोकरी करत होते. शेडगे आणि तळाशिलकर हे कोकणातलेच असल्यामुळे दोघांची मैत्री झाली. तळाशिलकर नोकरी सांभाळून व्यावसायिक नाटकांचं नेपथ्य, डिझाइनचं कामही करत. १९६२ मध्ये ‘गोवा हिंदू असोसिएशन’ने वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची निर्मिती करण्याचे ठरवले. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी तळाशिलकर सांभाळत होते. तळाशिलकरांनी कमिटीतील लोकांशी बोलून कमल शेडगे यांना नाटकाचं लेटरिंग तयार करण्याचं काम मिळवून दिलं. (तत्पूर्वी मोहन तोंडवळकर हे ज्या नाटकांचे प्रयोग कॉण्ट्रॅक्टने घेत असत, त्या ‘कळावे लोभ असावा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि इतर बऱ्याच नाटकांचं लेटरिंगचं काम शेडगे यांनी केलं होतं.) शेडगे यांचा पहिलाच अनुभव होता. वर्तमानपत्रात जाहिरात सुरू झाल्यावर व्यवसायातील अनेक निर्मात्यांचे या जाहिरातीच्या लेटरिंग डिझाइनने लक्ष वेधून घेतलं. यानंतर गोवा हिंदू असोसिएशनच्या मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली आणि इतर अनेक नाटकांचं लेटरिंग शेडगे यांनीच केलं. प्रभाकर पणशीकर यांनी नाट्यसंपदा या संस्थेची स्थापना केली आणि आपल्या पहिल्याच ‘मोहिनी’ या नाटकाच्या डिझाइनचं काम शेडगे यांना दिलं. नाट्यसंपदात त्या वेळी मोहन वाघ भागीदार होते. मोहन वाघ स्वत: उत्तम फोटोग्राफर असल्यामुळे व्यवसायात नाटकाच्या डिझाइनमध्ये कलाकारांचे फोटो टाकण्याची संकल्पना प्रथमच वापरण्यात आली. कमल शेडगे यांच्या याही डिझाइनचं नाट्यव्यवसायात खूप कौतुक झालं आणि मग त्यांना अनेक निर्मात्यांच्या नाटकांच्या डिझाइनचं काम मिळत गेलं.
कॉण्ट्रॅक्टने नाट्यप्रयोग करता करता मोहन तोंडवळकरांनी कलावैभव ही संस्था स्थापन केल्यावर त्यांच्या सर्व नाटकांचं डिझाइनचं काम शेडगे यांनीच केलं. त्यात प्रामुख्याने काचेचा चंद्र, जास्वंदी, महासागर, पुरुष, सावित्री, पर्याय, राहिले दूर घर माझे, गेला माधव कुणीकडे या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. यातील ‘काचेचा चंद्र’ या नाटकाच्या डिझाइनचा विशेष उल्लेख करावा लागेल. नाटकाला अपेक्षित बुकिंग मिळत नसल्यामुळे तोंडवळकर यांनी नाटकातील नट डॉ. श्रीराम लागू भावनाबाईंना खांद्यावर उचलून नेत आहेत, अशी काहीशी बोल्ड डिझाइन वर्तमानपत्रातील जाहिरातीत टाकली आणि तिथपासून ‘काचेचा चंद्र’ला हाऊसफुल्लचा बोर्ड लागणं सुरू झालं.
नाट्यसंपदातून बाहेर पडल्यानंतर १९६७ मध्ये मोहन वाघ यांनी स्वत:ची चंद्रलेखा ही संस्था स्थापन केली. चंद्रलेखाची पहिली नाट्यनिर्मिती होती ‘गारंबीचा बापू’. या पुनरुज्जीवित नाटकाचं डिझाइन कमल शेडगे यांचंच. मोहन वाघ यांनी चार-पाच पुनरुज्जीवित नाटकांची निर्मिती केल्यावर पहिलं नवीन नाटक केलं, ‘घरात फुलला पारिजात या’. त्यानंतर मोहन वाघ यांच्या (काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नाटकांचं वगळता) गरुडझेप, जिगर, पंखांना ओढ पावलांची, मृत्युंजय, गुड बाय डॉक्टर, झुंज, छावा, गगनभेदी, प्रेमाच्या गावा जावे, रंग उमलत्या मनाचे, वादळ माणसाळतंय, आम्ही जगतो बेफाम, दीपस्तंभ, ऑल दि बेस्ट आणि इतर अनेक नाटकांचं डिझाइन शेडगे यांनीच केलं होतं. कमल शेडगे यांनी डिझाइन केलेल्या संस्थांची आणि नाटकांची यादी करायची म्हटलं तर खूपच लांबेल. तरीही विशेष उल्लेख करायचा तर राजाराम शिंदे (नाट्यमंदार), अनंत काणे (अभिजात), मच्छिंद्र कांबळी (भद्रकाली प्रॉड.), लता नार्वेकर (श्रीचिंतामणी), उदय धुरत (माऊली प्रॉड.), महेश मांजरेकर (अश्वमी थिएटर्स), प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी (जिगिषा), अजित भुरे (असिम), अशोक हांडे (चौरंग) या निर्मात्यांचा आणि त्यांच्या संस्थांचा करावा लागेल.
आता लेटरिंग आणि डिझाइन तयार करणं कॉम्प्युटरमुळे फारच सोप्पं काम झालं आहे. पण पूर्वीच्या काळी लेटरिंग हाताने करावं लागत असे आणि मग फोटो कट-पेस्ट करून डिझाइन तयार केलं जात असे. प्रत्येक नाटकाचं लेटरिंग आणि डिझाइन वेगळं होईल, याकरता शेडगे खूप दक्षता घेत. वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या पानावरील नाटकांच्या जाहिरातीत जास्तीत जास्त डिझाइन्स शेडगे यांच्या असत, तरी प्रत्येक नाटकाचं लेटरिंग आणि डिझाइन वेगळंच असे.
नाटकाच्या व्यतिरिक्तही शेडगे यांनी सृजनशीलता जपली आहे. महाराष्ट्र टाइम्स (जुना), सामना या वर्तमानपत्रांचं, अक्षर, चंदेरी, षटकार या नियतकालिकांचं, कथाश्री, दीपलक्ष्मी या अंकांचं लेटरिंग कमल शेडगे यांनीच केलं आहे. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन, नाट्यपरिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरील पु. ल. देशपांडे – महाराष्ट्र राज्य कला अकादमी, मुंबई ही सर्व अक्षरमाला कमल शेडगे यांनीच सजवली आहे. इतकंच नव्हे, तर जयंत साळगांवकर यांच्या कालनिर्णय या दिनदर्शिकेचे डिझाइन, अलीकडच्या काळात गाजलेल्या अनेक मराठी-हिंदी चित्रपटांची लेटरिंग शेडगे यांनीच केली होती.
शेडगे यांच्या लेटरिंग आणि डिझाइन्सची आजपर्यंत मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई आणि पुण्यात नऊ प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. माझी अक्षरगाथा, कमलाक्षरे, चित्राक्षरे ही शेडगे यांची तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. चित्राक्षरे या पुस्तकाचं प्रकाशन वसईच्या नाट्यसंमेलनात निर्माते मोहन तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, हे विशेष. दुर्दैवाने कमल शेडगे यांनी ज्या क्षेत्रासाठी आपली संपूर्ण अक्षरकला पणाला लावली, त्या नाट्य-सिनेसृष्टीने त्यांच्या कलेचा उचित सन्मान केला नाही, विशेष दखल घेतली नाही, असंच खेदानं म्हणावं लागेल. जाहिरात डिझाइनिंगच्या क्षेत्रात कमल शेडगे यांचा मुलगा अक्षर शेडगेही गेली अनेक वर्षं काम करतो आहे आणि उत्तम नावलौकिक मिळवतो आहे. कमल शेडगे यांचे ४ जुलै २०२० रोजी निधन झाले.