कर्जत । डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या मालकीच्या जागेवरीलअतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. चौक कर्जत – मुरबाड रस्त्यालगत चारफाटा परिसरातील विद्यापीठाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि दुकाने पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहेत.

कर्जत कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख भरत वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अभियंता राहुलघाडगे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र मर्दाने, मालमत्ता अधिकारी डॉ. राजू सावळे यांच्यासह विविध शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रायगड पोलीस दलाच्यावतीने पोलीस राईट कंट्रोल (आर. सी.पी.) अलिबागचे ३० कर्मचारी आणि कर्जत स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

याबाबतचे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने विद्यापीठाच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले आहे. यापूर्वी २०२२ साली याच ठिकाणची अनधिकृत दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीतील दुकाने हटवली होती. मात्र कृषी विद्यापीठाच्या जागेतील दुकान मालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे संबंधित अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.