जन्म.१५ जुलै १९२५ कोलकाता येथे.
बादल सरकार हे केवळ नाटककार नव्हते तर रंगभूमीच्या माध्यमातून जगण्याचा शोध घेणारे कलावंत होते. अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या व कमानी रंगमंचात जखडून गेलेल्या व्यावसायिक रंगभूमीऐवजी ‘बदलासाठी रंगभूमी’ ही संकल्पना त्यांनी मांडली. बादल सरकार यांचे मूळ नाव सुधींद्र सरकार. महेंद्रलाल व सरला सरकार हे त्यांचे मातापिता होत. बादल सरकार यांचे शिक्षण
कोलकाता येथे झाले. त्यांनी १९४७ साली बी. ई. (स्थापत्य अभियांत्रिकी) ही पदवी, १९५२ मध्ये नगररचना व प्रादेशिक नियोजन शास्त्राची पदविका, तसेच १९६९ साली लंडन येथील नगररचनाशास्त्राची पदविका. त्यांनी भारतात तसेच ग्रेट ब्रिटन, नायजेरिया येथेही स्थापत्य अभियंता व नगररचनाकार म्हणून त्यांनी कार्य केले. ‘कलकत्ता मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग ऑर्गनायझेशन’ मध्ये प्रमुख नगररचनाकार म्हणून त्यांनी काम केले. १९५६ पासून त्यांनी नाटयलेखनास सुरूवात केली. सुमारे तीसांहून अधिक नाटके लिहिली. बडो पिशिमा (१९६१), रामश्याम जदु (१९६३), एवम् इंद्रजित (१९६८), बाकी इतिहास (१९६९), सारा रात्तिर (१९७७), पगला घोडा (१९७७), मिछिल (१९७८), भोमा (१९८०), बल्ल्भपुरेर रूपकथा, प्रलाप, बासी खबर, सगीना महतो, अबू हसन, त्रिंशे शताब्दी, सुखपाथ्य भारतेर इतिहास इ. त्यांची रंगभूमीवर गाजलेली प्रमुख नाटके होत. त्यांनी हॉवर्ड फास्टच्या स्पार्टाकस (१९५२) या कादंबरीचे नाटय रूपांतर (१९७२) केले. थिएटरर भाषा हा त्यांचा समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी इंग्रजीतूनही लेखन केले. द थर्ड थिएटर : द चेंजिंग लँग्वेज ऑफ थिएटर, व्हॉयिजीस इन थिएटर (ही व्याख्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध) हे त्यांचे इंग्रजी लिखाण होय. नट, दिग्दर्शक, संस्थाचालक, नाटयचळवळीचे प्रवर्तक म्हणूनही बंगाली रंगभूमीवर त्यांनी मौलिक कार्य केले आहे. ‘शताब्दी’ या नाटयसंस्थेची स्थापना (१९६७), खुला रंगमंच, ‘अंगणमंच’ या नाटयचळवळींमध्ये १९७२ पासून सक्रिय सहभाग, पथनाटये व समूहनाटये (कम्यूनिटी थिएटर) प्रभावीपणे सादर करून या संकल्पना रूजविण्याचे कार्य, अशा अनेक अंगांनी त्यांची रंगभूमीवरील कारकीर्द संस्मरणीय ठरली आहे.
असंगत नाट्याच्या मुळाशी असलेली, मानवी अस्तित्वाची निरर्थकता व त्यातून उद्भवणारी आधिभौतिक वेदना ही बादल सरकारांच्या सुरूवातीच्या नाटकांतून प्रखरपणे व्यक्त होते. ‘एवम् इंद्रजित’ हे नाटक याचे एक उदाहरण होय. निरर्थकतेचा सूचक अशा सिसिफसच्या मिथ्यचा प्रत्यक्ष संदर्भही त्यात येतो. एवम् इंद्रजित मधली मध्यमवर्गीय व्यक्तिगत जीवनातील निष्क्रियता बाकी इतिहासमध्ये अपराधजाणिवेचे रूप धारण करते. अमानुष सांस्कृतिक अवनतीचा अवघा इतिहासच इथे साकार होतो. त्रिंशे शताब्दीमध्ये (१९६९) अपराध-जाणिवेला छेद देणारे, जबाबदारीचे नवे भान सामोरे येते. बादल सरकारांच्या सुरूवातीच्या नाटकांतला अस्तित्ववादी पवित्रा पुढे बदलला व सामाजिक बांधीलकीचे -समकालीन समस्यांच्या प्रतिबद्धतेचे – नवे भान त्यांच्या नाटकांतून प्रखरपणे व थेटपणे प्रकटले. स्पार्टाकस पासून या बदलाची सुरूवात झाली. मिछिल, भोमा, सुखपाथ्य भारतेर इतिहास ही या सामाजिक विचारधारेतील काही प्रमुख नाटके होत. बादल सरकारांची काही नाटके नेहमीच्या पारंपरिक कमानी रंगमंचावर सादर झाली पण पुढे कमानी रंगमंचाची सांकेतिक, बंदिस्त चौकट मोडून त्यांनी मुक्तपणे नाटके केली. परदेशातील वास्तव्यात आर्तो, गोटोव्हस्की, शेकनर इ. ‘आव्हांगार्द’ (अगेसर) नाटय्कलावंतांच्या प्रभावातून ‘पुअर थिएटर’, ‘एरीना थिएटर’, ‘इंटिमेट थिएटर’, ‘नॉन्व्हर्बल थिएटर’ इ. नवनव्या संकल्पना बंगाली रंगमंचावर त्यांनी रूजविल्या. त्यांच्या सामाजिक आशयाच्या नाटकांचे आवाहन मोठया जनसमूहाला असल्याने खुला रंगमंच, पथनाटये, समूहनाट्ये इ. आविष्कार प्रभावीपणे राबवून त्यांनी बंगाली रंगभूमी प्रगतिपथावर नेण्याचे कार्य केले.
बादल सरकारना नाटयलेखनासाठी संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६७), पद्मश्री किताब (१९७२), नेहरू अधिछात्रवृत्ती (१९७१-७३), मध्यप्रदेश शासनातर्फे कालिदास सन्मान (१९९२-९३), संगीत नाटक अकादमीची अधिछात्रवृत्ती (१९९७) अनेक मानसन्मान लाभले. त्यांची अनेक नाटके भारतीय व पाश्चात्त्य भाषांत अनुवादित व प्रयोगरूपांत सादर झाली आहेत. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांची अनेक नाटके अनुवादित-रूपांतरित स्वरूपात सादर झाली आहेत. काहींचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल : ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेने सादर केलेले बाकी इतिहास (अनु. अरविंद देशपांडे, १९७३), अंत नाही ‘आविष्कार’ संस्थेने केलेली सारी रात्र (अनु. पु. ल. देशपांडे प्रयोग- १०७२), अबू हसन (अनु. अरूण काकडे) सत्यदेव दुबे यांच्या ‘थिएटर युनिट’ने केलेली वल्ल्भपूरची दंतकथा (अनु. अमोल पालेकर, प्रयोग-१९६९) व पगला घोडा ही नाटके, तसेच जुलूस (दिग्दर्शक – अमोल पालेकर), एवम् इंद्रजित इ. नाटकांचेही प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले. प्रायोगिक मराठी रंगभूमी विकसित करण्यात या नाटकांचा मोठा वाटा आहे. बादल सरकार यांचे १३ मे २०११ रोजी निधन झाले.





















