कर्जत । तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर भक्तांची गर्दी आणि रात्री पालखी सोहळा या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने कर्जत तालुक्यात विविध क्षेत्रात आपल्या कामातून ठसा उमटविणारे व्यक्तींचा सन्मान दुपारच्या सत्रात करण्यात आला. दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ मठात अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री दत्त जयंती सोहळा साजरा झाला. पळसदरी (पुण्यनगरी) येथील श्री स्वामी समर्थ मठात आयोजित श्री दत्त जयंती उत्सव आणि पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. श्री दत्त जयंती उत्सवाची सुरुवात पहाटेच्या काकड आरतीने आणि सामुदायिक जपाने उत्सवाला सुरुवात झाली. सकाळी श्री स्वामी समर्थाच्या परमपवित्र पादुकांवर महाअभिषेक करण्यात आला. या पादुकांचे दर्शन फक्त वर्षातून तीन वेळाच होते. त्यामुळे स्वामी समर्थ यांच्या भाविकांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासून गर्दी केली होती. दुपारी महाआरती आणि संध्याकाळी श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव आणि पालखी सोहळा मुख्य आकर्षण ठरला. पालखी सोहळ्याच्या मार्गावर भक्तगणांनी फुलांची सजावट करून वातावरण भक्तिमय केले.