जन्म. २७ जून १९४६
वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली होती. १९६८ मध्ये एम.ए झाल्यानंतर त्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. पाच वर्षांनंतर मग त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. रविवारीय पुरवणीचे काम त्या बघत. साहित्याची आवड आणि त्यांच्या कामाचा वकूब पाहून १९८० मध्ये ‘लोकसत्ता’चे धाकटे भावंड असलेल्या ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली.
काही काळातच ‘लोकप्रभा’ हे मराठी परिवारामध्ये लोकप्रिय बनले. ‘शेवटचे पान’ हे ‘लोकप्रभा’तील त्यांचे संपादकीय त्या काळातील अभिजन वर्गात आवर्जून वाचले जात असे. विविध घटनांवर त्या काळी ‘लोकप्रभा’चे काढलेले विशेषांकही गाजले. नंतर वसुंधरा पेंडसे यांनी अल्पकाळ अन्य एका दैनिकाच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली. १९९१ मध्ये त्या ‘नवशक्ति’ या दैनिकाच्या संपादक झाल्या तेव्हा मराठी पत्रकारितेत नवा अध्याय लिहिला गेला. एखाद्या मराठी दैनिकाच्या संपादक होणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार ठरल्या. संपादकाला असलेल्या लिखाण स्वातंत्र्यावरच गदा येत असल्याचे दिसू लागल्याने वर्षभरातच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. १९९४ ते ९६ या काळात ‘लोकसत्ता’मध्ये ‘कुटुंब कथा’ हे सर्वसाधारण कुटुंबात नेहमी उद्भवणाऱ्या समस्यांची चर्चा करणारे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले होते.
या सदरातील लेखांचे नंतर पुस्तकही निघाले. मुंबई दूरदर्शनवर संस्कृत साहित्यावर आधारित ‘अमृत मंथन’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्या करत. १९७९ ते ९२ अशा दीर्घकाळ चाललेल्या या कार्यक्रमात महाकाव्य, नाटय़ याबरोबरच विज्ञानातील विविध विद्याशाखांचाही सुंदर आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतला जात असे. नंतर अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा, राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. कोणतेही विशेष परिश्रम न घेता, अभ्यास न करता उथळ पत्रकारिता करणाऱ्या नव्या पिढीबद्दल वसुंधरा पेंडसे नेहमी चिंता व्यक्त करीत. कुटुंबकथा, कौटिल्यीय अर्थशास्त्र परिचय, मूल्याधार ही पुस्तके त्यांनी लिहिली. ज्येष्ठ पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक हे त्यांचे पती. वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन १५ जुलै २०१६ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे वसुंधरा पेंडसे-नाईक यांना आदरांजली.