सोमवारी मुंबईत ४५ नवीन रुग्ण आढळले असून शून्य मृत्यू नोंदवला गेला. सोमवारी मुंबईत ५,०५३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
यात ४५ रुग्ण आढळले असून यातील केवळ एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४५ पैकी केवळ एकाच रुग्णाला लक्षणे असल्याचे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले. सोमवारी ४५ रुग्ण आढळले असतानाच मुंबईत एकही रुग्ण दगावलेला नाही.
३४ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. सध्या रुग्णवाढीचा दर ०.००७ टक्के असून मुंबईत एकही चाळ वा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही. दरम्यान, राज्यात ८४ नवे बाधित आढळले, तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ९१६ रुग्ण उपचाराधीन आहेत.
ठाणे जिल्ह्यात सोमवारी सहा रुग्ण आढळले. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सहा रुग्णांपैकी नवी मुंबई चार, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.