जन्म. १५ जुलै १९०३ तामिळनाडूतील वीरदूनगर येथे.
तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कुमारासामी कामराज उर्फ के. कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी जालियानवाला बाग हत्याकांडाच्या निषेधाच्या निमित्ताने ते सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात उतरले आणि गांधीजींचं नेतृत्व स्वीकारून असहकार आंदोलनात आपलं योगदान दिलं. १९३० साली गांधीजींनी सुरु केलेल्या मिठाच्या सत्याग्रहात ते पहिल्यांदा जेलमध्ये गेले. त्यानंतर तर कामराज आणि जेल हे समीकरणचं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अनेकदा कारावास भोगला. आपलं शिक्षण देखील त्यांनी जेलमध्ये राहूनच पूर्ण केलं.
जेलमध्ये असतानाच त्यांची महापालिकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, पण गांधीवादी असणाऱ्या कामराज यांनी जेलमधून बाहेर पडताच या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पदाचा राजीनामा देताना कारण असं दिलं की, तारुण्यात महापालिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना कामराज यांनी सांगितलेल्या या तत्वाशी पुढे ते पंतप्रधानपद नाकारताना देखील प्रामाणिक राहिले. शास्त्रीजींच्या निधनानंतर आलेला पंतप्रधानपदाचा प्रस्ताव त्यांनी केवळ याच कारणासाठी नाकारला कारण त्यांचं हिंदीवर आणि इंग्रजीवर प्रभुत्व नव्हतं आणि हिंदी येत नसल्याने ते पंतप्रधानपदाला न्याय देऊ शकणार नाहीत, असं त्यांना वाटायचं.
देशात सर्वप्रथम ‘मध्यान्ह भोजन कार्यक्रम’(मिड-डे मिल) सुरु करण्याचं श्रेय के.कामराज यांना जाते तामिळनाडूचे मुख्यमंत्री असताना त्यांनीच हा कार्यक्रम सुरु केला. तमिळनाडूमधील लाखो बालकांना किमान एक वेळा तरी उत्कृष्ट प्रतीचं पोटभर जेवण मिळालं पाहिजे, हा त्यामागे त्यांचा उद्देश होता.
१९५४ ते १९६३ या कालावधीत तीन वेळा तामिळनाडूचे म्हणजेच तत्कालीन मद्रासचं मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर २ ऑक्टोबर १९६३ रोजी कामराज यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले.
राजीनामा देताना कामराज यांनी असं कारण सांगितलं की काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना सत्तेची लालसा निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस संघटनेत काम करायला हवं.
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कामराज यांची ही योजना खूप आवडली आणि त्यांनी ती देशभरात लागू केली. या योजनेंतर्गत त्यावेळी ६ कॅबिनेट मंत्री आणि वेगवेगळ्या राज्याच्या ६ मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन संघटनेत सक्रीय व्हावं लागलं होतं.
कामराज यांची ही योजना भारतीय राजकारणात ‘कामराज प्लॅन’ म्हणून ओळखली जाते. या योजनेंतर्गत लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, बाबू जगजीवन राम, स.का. पाटील, बिजू पटनायक यांसारख्या दिग्गजांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर कामराज यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. १९६४ साली जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष के.कामराज यांच्यावरच देशाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी होती. त्यावेळी चर्चेत २ नावं होती. लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई.
मोरारजी देसाई यांना या पदासाठी निवडणूक हवी होती. कामराज मात्र निवडणूक घेण्याच्या विरोधात होते. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील प्रतिमेवर वाईट परिणाम होईल असं त्यांचं मत होतं. त्यामुळे देशाचा पंतप्रधान सर्वसंमतीने निवडण्यात यावा, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. कामराज यांनी तीन दिवस देशातल्या मोठ्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आणि बहुतेक नेते लाल बहादूर शास्त्री यांच्या नावावर एकमत असल्याची माहिती त्यांनी मोरारजी देसाईंना दिली. मोरारजी यावर नाराज होते पण शेवटी त्यांनी हा निर्णय मान्य केला आणि लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले. १९६६ साली परत एकदा शास्त्रीजींच्या निधनानंतर २ वर्षांपूर्वीचंच आव्हान कामराज यांच्यासमोर परत एकदा नव्याने उभा राहिलं. यावेळी देखील मोरारजींनी आपली दावेदारी सादर केली होतीच. दुसरं नाव होतं इंदिरा गांधी यांचं. पण यावेळी कामराज यांच्या समर्थकांची इच्छा अशी होती की स्वतः कामराज यांनीच पंतप्रधानपदावर विराजमान व्हावं.
त्या काळी काँग्रेसमधल्या गैर हिंदी भाषिक नेत्यांच्या गटाला त्यावेळी माध्यमांमध्ये सिंडीकेट असं म्हंटलं जायचं. या गटामध्ये बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री अतुल्य घोष, कर्नाटकचे एस.निजलिंगप्पा, महाराष्ट्राचे स.का.पाटील, नीलम संजीव रेड्डी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा त्याकाळी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात दबदबा होता. सिंडीकेट नेत्यांच्या पाठींब्याशिवाय कुठलीच व्यक्ती पंतप्रधान बनू शकत नव्हती. के.कामराज हे सिंडीकेट गटाचे प्रमुख समजले जायचे.
कामराज यांनी पंतप्रधानपदासाठी आपली दावेदारी सादर करण्यासाठी सिंडीकेट गटाने कामराज यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली होती. सिंडीकेट गटाच्या बैठकीत अतुल्य घोष यांनी त्यांच्यासमोर तसा प्रस्ताव ठेवला होता.
कामराज यांना पंतप्रधानपद स्वीकारायला नेमकी अडचण काय आहे असा प्रश्न ज्यावेळी घोष यांनी त्यांना विचारला त्यावेळी त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याचं कारण देत हा प्रस्ताव नाकारला होता.
मोरारजी देसाई यांना परत एकदा पंतप्रधानपदासाठी निवडणुका व्हायला हव्या होत्या. परंतु कामराज निवडणुका टाळून सर्वसहमतीने पंतप्रधान निवडू इच्छित होते. कामराज हे मोरारजींच्या पंतप्रधान बनण्याच्या विरोधात देखील होते. पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या दावेदार असणाऱ्या इंदिरा गांधींना हे माहित होतं की कामराज यांच्या समर्थनाशिवाय त्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकत नाहीत. परंतु कामराज यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय आणि ते स्वतः पंतप्रधान होऊ इच्छितात का हे जाणून घेण्यासाठी इंदिरा गांधींचे सल्लागार डी.पी. मिश्रा यांनी राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांसह कामराज यांची भेट घेतली.
या भेटीत इंदिरा समर्थक गटाने कामराज जर पंतप्रधान होऊ इच्छित असतील तर आपल्या गटाचा त्यांना पाठींबा असेल असं त्यांना सांगितलं पण कामराज यांनी आपण पंतप्रधान होऊ इच्छित नाही, हे स्पष्ट केलं. कामराज यांच्या नकारानंतर डी.पी. मिश्रांनी कामराज यांच्याकडून इंदिरा गांधींना पाठींबा मागितला आणि तसा त्यांनी तो दिला.
पंतप्रधानपदासाठी निवडणूक न होता सर्वसहमतीने पंतप्रधान निवडण्यात यावा यासाठी कामराज यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही. शेवटी इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यादरम्यान लढत झाली आणि त्यात इंदिरा गांधींनी मोराराजींचा पराभव करत देशाचं पंतप्रधानपद मिळवलं. देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं होतं की पंतप्रधान निवडण्यासाठी काँग्रेसमध्ये निवडणूक झाली होती आणि याच निवडणुकीत देशाने आपल्या पहिल्या महिला पंतप्रधानांची निवड केली होती. के. कामराज यांच्या निधनानंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला.