कर्जत । मार्केटिंग फेडरेशनचे माध्यमातून भाताची हमी भावाने खरेदी करण्यात येते. त्यासाठी नेरळ येथील केंद्रावर बुधवारपासून भाताची हमी भावाने खरेदी केली. नेरळ, कळंब भागातील ४०० शेतकऱ्यांनी आपल्या भाताची विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे. कर्जत तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक पीक भाताचे घेतले जाते. यावर्षी सरत्या पावसामुळे भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे.
पावसामुळे भाताच्या पिकावर आणि उत्पन्नावर मोठे परिणाम झाले आहेत. तरीदेखील शेतकऱ्यांनी भाताचे पीक गोळा करून साठवून ठेवले आहे. कर्जत तालुक्यात भाताची सर्वाधिक शेती केली जात असल्याने भाताचे पीक प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात जमा होते. कर्जत तालुक्यातील नेरळ सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी आणि कशेळे आदिवासी भागासाठी जी भाताची खरेदी केंद्र सुरु होणे आवश्यक आहेत.
तशी मागणी शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदार यांच्याकडे केली होती. त्यानुसार नेरळ येथे विविध विकास कार्यकारी सोसायटी यांना मार्केटिंग फेडरेशन कडून अधिकार देण्यात आल्यावर आज भाताची हमी भावानेखरेदी केंद्र सुरू झाले.
नेरळ खांडा येथील १ हजार १०० किंटल क्षमता असलेल्या गोदामात भाताचे हमी भाव केंद्र सुरू झाले. या केंद्राचे उद्घाटन नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रविरले यांचे हस्ते विक्रीसाठी आलेल्या भाताचे पूजन करून झाली. त्यानंतर जेष्ठ संचालक नारायण तरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भाताची खरेदी सुरू झाली.
भाताची हमी भावाने विक्री करण्यासाठी आलेल्या पहिले शेतकरी कोल्हारे गावातील राहुल हजारे यांचे स्वागत संस्थेचे वतीने करण्यात आले. त्यावेळी उप सभापती रवींद्र झांजे, संचालक सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते, नारायण तरे, यशवंत कराळे, विष्णू कालेकर, धोंडू आखाडे आदी उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी मारुती विरले, राहुल हजारे, दत्ता सोनावले, आदी उपस्थित होते.