रसायनीतील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 12 हजार नागरिकांची दूषित पाण्यापासून होणार सुटका जल जीवन मिशन मधील एक कोटी 20 लाखाच्या योजनेचे शुभारंभ कोणत्याही लोकप्रतिनिधी शिवाय लाडीवली येथील महिलांनीच केले. वर्षानुवर्षे गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पिण्यासाठी पाताळगंगेच्या प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागत होता.या दूषित पाण्यापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी लाडीवलीतील बचत गटाच्या महिलांनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी आणि राष्ट्रसेवा दल या संघटनांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी मोर्चे,आंदोलन व आमरण उपोषण करून संघर्ष केला.
महिलांच्या या संघर्षला यश मिळाले असून १ कोटी २० लाख रुपयांच्या ‘जल जीवन मिशन’ मधील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (१०जून ला) लाडवलीतील संघर्ष साथी विजयाताई मांडवकर, ज्योतीताई पाटील, राजश्री म्हामणकर, रेखा कालेकर, नीता वाघे राजश्री भोसले, दर्शना म्हामणकर, सुरेखा वाघे ,मानसी वाघे ,सविता पवार, आशा शेडगे यांच्यासह गावातील ज्येष्ठ महिलांनी मोठ्या उत्साहात श्रीफळ वाढवून केला यावेळी बोलताना येथील महिलांनी सांगितले की लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत होते.
गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपासून ते आमदारांपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वासन पलीकडे काहीच दिले नाही म्हणूनच आजपर्यंत बारा हजार नागरिक बावन्न वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या चावणे पाणीपुरवठा योजनेतुन पाताळगंगेचे दूषित व अशुद्ध पाणी पीत होते. मात्र रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन वर्षापुर्वी शुद्ध पाण्याचा संकल्प करून सातत्याने पाठपुरावा केला तो आज पूर्णत्वास येत असल्याने समाधान वाटत असल्याचे सांगत यासाठी सहकार्य करणारे पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांचे विशेष आभार मानत पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर एम आय डी सी कडून उद्भव स्रोत घेऊन लाडीवली गाव, लाडीवली आदिवासी वाडी, आकुलवाडी, डोंगरीची वाडी, फलाट वाडी आणि गुळसुंदे गावांतील सर्व नागरिकांना एमआयडीसीचे शुद्ध पाणी मिळेल असेही सदर महिलांनी सांगितले.