पेण । मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील जिते गावाजवळ असणाऱ्या आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीयांनी अनाधिकृतपणे भंगारच्या अड्डा उभारला आहे. या ठिकाणी कंपन्यांचा येणार माल चोरीद्वारे घेतला जात असल्याची माहिती दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांना मिळताच त्यांनी घाड टाकून जेएसडब्ल्यू कंपनीचा १० लाखांचा चोरीचा स्टील बार जप्त केला आहे.

रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतपणे भंगारवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्यातच जेएसडब्ल्यू कंपनी डोलवी येथून टीएमटी स्टील बार माल विविध कंपन्याना सप्लाय करण्यात येतो. असाच ज्योती ट्रान्सपोर्ट मधील ट्रेलर एमएच ४६ बीएम ६५७९ वरील चालक व ईतर काही ट्रेलर चालकांनी सदरचा पूर्ण माल विविध कंपन्याना न पुरविता अंदाजे १५ ते २० टन मालाचा अपहार करुन तो जिते येथील आकाशदीप हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागी अनाधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांकडे उतरविले असल्याची माहिती कंपनीचे जनरल मॅनेजर फिर्यादी पंकजकुमार बदरीप्रसाद अग्रवाल यांनीदादर सागरी पोलीस स्टेशनला दिली असता त्यानुसार तपास करत दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांनी आपल्या पथकासह सदर भंगारवाल्याकडे धाडटाकली असता त्याठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचे १५ ते २० टन वजनाचे सुमारे दहा लाख रुपयांचे स्टील बार जप्त करून कामगार आरोपीस अटक केली आहे. सदर कारवाईमुळे मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृतपणे उभारलेल्या भंगारवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १०६/२०२४ नुसार नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता नुसार ३१६ (३), ३ (५) कलम दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे हे करीत आहेत.