भारतात ‘दूरदर्शन’ २ ऑक्टोबर १९७२ ला रुजू झाले. तांत्रिकदृष्टय़ा भारतात टीव्हीचा जन्म झालेला होता, पण त्याची सुरुवात मुंबईत झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य मिळालं. ‘दृष्टिआडची सृष्टी..’चा अनुभव मला अगदी पहिल्या दिवशीच मिळाला. २ ऑक्टोबर १९७२. वार सोमवार. भाभा ऑडिटोरियम् कुलाबा येथे ‘दूरदर्शन’च्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. साडेसहा ते साडेसातचा कार्यक्रम. थेट प्रक्षेपण होणार होतं. महाराष्ट्राचे त्या वेळी गव्हर्नर होते अली यावर जंग आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री. माझी बदली आकाशवाणी मुंबईहून ‘दूरदर्शन’ला झाली होती. मी त्या कार्यक्रमाचा रंगमंच संचालक होतो.
सहा वाजून गेले. सव्वासहा झाले. सगळीकडे शुकशुकाट. एक पोलीस नाही की एक पोलीस व्हॅन नाही. वास्तविक पंतप्रधान इंदिरा गांधीच येणार होत्या. पण त्यांनी त्यांच्याऐवजी केंद्रीय आरोग्यमंत्री
उमा शंकर दीक्षित यांना पाठवलं. भारताच्या कारकीर्दीत शिरपेच लावणारा सोहळा इतका थंड का? माझे निर्देशक होते पी. व्ही. कृष्णमूर्ती. मी त्यांना सांगितलं, ‘‘साहेब गव्हर्नर साहेबांना फोन तरी करा. मी कनिष्ठ ऑफिसर असल्याने मला फोन करता येत नव्हता. त्यांनी फोन लावला. त्यांच्या पी.ए.नी उत्तर दिलं, ‘काय उद्घाटन आज आहे? मी माझ्या डायरीत ३ तारीख लिहून ठेवलेली आहे.’ त्याला जेव्हा कळलं की तारीख ३ नाही २ आहे, त्याची काय तारांबळ उडाली असेल देवच जाणो.
पहिला कार्यक्रम पसायदान, संचालक वसंत देसाई. दुसरा बिस्मिल्ला खान यांचं शहनाईवादन आणि त्यानंतर आशा पारेख आणि गोपीकृष्ण यांचं कथ्थक नृत्य. भारतीय ‘दूरदर्शन’च्या इतिहासात ही नोंद झाली पाहिजे की पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ६.३० ऐवजी ६ वाजून ३८ मिनिटाला सुरू झाला.
इस्लाम धर्मात पाच वेळा नमाज पठण होते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, सूर्यास्त झाल्यावर व रात्री. कार्यक्रम उशिरा सुरू झाला. संध्याकाळच्या नमाजची वेळ जवळ आली. बिस्मिल्ला खान साहेबांनी मला जवळ बोलावले, ‘‘याकूब, नमाज का वक्त हो गया है। हम नमाज पढने जा रहे है। दुसरा कोई आयटम रखो।’’ आता दुसरा आयटम म्हणजे दोन्ही हातांनी शंखच वाजवायला लागणार होता. मी त्यांना विनंती केली, ‘‘खान साहेब, गरीब की नौकरी की सोचो, मैं तो मर जाऊंगा। घर से बेघर..’’ त्यावर खान साहेबांचं उत्तर, ‘‘हम तुम्हे नई नौकरी देगे।’’ कसंबसं मी त्यांना राजी केलं.
‘दूरदर्शन’ची पहिली निवेदिका ज्योत्स्ना किर्पेकर कॅमेऱ्यासमोर आली. आपल्या गोड आवाज व व्यक्तिमत्त्वाने तिनं ‘पसायदान’च्या नंतरच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं. बिस्मिल्ला खान साहेबांनी ‘सा’ लावला आणि संबंध प्रेक्षक वर्गातून ‘वाह वाह’चे स्वर बाहेर पडले. त्याच वेळी आशा पारेख आणि गोपीकृष्ण आपल्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करत होते. ग्रीन रूममध्ये कुणी तरी चहा पिऊन ग्लास ठेवला होता. तो टेबलवरून खाली पडला आणि फुटलेल्या ग्लासचा तुकडा नेमका आशा पारेखयांच्या पायात रुतला. रक्तबंबाळ झाला पाय. आता ती कशी नाचणार? तिने स्वत:च जाहीर केलं, ‘‘अब मैं नहीं नाचूंगी’’ मला एकदम झाशीच्या राणीनं त्या काळी सांगितलेलं, ‘अब मैं अपनी झाँसी नही दूंगी’ची आठवण झाली. माझी धावपळ सुरू झाली. होते नव्हते तेवढे डॉक्टर, वैद्य, सर्जन, हकीम ज्यांना मनुष्याच्या शरीराबद्दल थोडीफार जानकारी असेल सगळ्यांना पाचारण केलं. बाहेर प्रेक्षकगृह आणि घराघरांत टीव्ही पाहणारे बिस्मिल्ला खान साहेबांच्या सनईवर दाद देत असतील. माझी दाद कोण घेतंय- कुणी जवळ नव्हतं.
एक तर आशा पारेख खूप प्रसिद्ध अभिनेत्री, सुंदर, प्रत्येक हिंदी पिक्चर सुपर हिट. ‘मैं यह टॅबलेट नहीं खाऊंगी’, ‘मैं यह मरहम नही लगाऊंगी’, ‘स्किन जल जायेगी’, ‘मैं पैर उपर नही कर सकूंगी’ ‘मैं यह नही करूंगी, मैं वह नही करूंगी’, सगळा नन्नाचा पाढा. मी थोबाडीत मारल्यासारखा एका कोपऱ्यात उभा, ‘या अल्ला मेरी लाज रखियों’ म्हणत. काही क्षण गेले आणि माझ्या कानावर शब्द पडले, ‘‘याकूबजी अब मैं नाच सकती हूँ।’’ कसला आनंद झाला. मनात म्हणालो, ‘मला जर कथ्थक आलं असतं तर मीच गोपीकृष्ण यांच्याबरोबर जुगलबंदी केली असती.’
नृत्य सुरू झालं. बिस्मील्ला खानसाहेब नमाज पठणासाठी गेले. सरकारी कार्यक्रम, तिकीट वगैरे काही नाही, ‘हाऊस फुल’ प्रेक्षकगृहात चार कॅमेरे लावले गेले होते- ‘दूरदर्शन’च्या कार्यक्रमाकरिता लावतात तसे. एक, दोन, तीन, चार, पाच मिनिटं झाली आणि एकदम सगळा प्रेक्षक वर्ग ओरडला. बचाओ- मेलो- वाचवा- मला काहीच कळलं नाही काय झालं ते. मध्य ठिकाणी हत्तीच्या वजनाएवढा कॅमेरा (पूर्वी कॅमेरे खूप मोठे आणि वजनदार होते) स्टॅण्डवरून खाली कोसळला होता. सुदैवाने समोर कुणी बसलं नव्हतं. नाही तर लग्न आणि श्राद्ध एकाच वेळी साजरं करावं लागलं असतं. आरडाओरडा.. कॅमेरा पडला, कॅमेरा पडला.. पेशवाई काळातला प्रसंग मला आठवला. ‘नारायणरावांचा खून झाला.’
कसंबसं करून आठ-दहा गडी माणसांनी कॅमेरा वर उचलून ठेवला. कॅमेरामन होते सतीश भाटिया. कॅमेरा खाली पडला पण तो बंद झाला नव्हता. त्यामुळे तो चालूच होता. कथ्थक नाचाबरोबर कुणाचे पाय, चप्पल, बूट, काढून ठेवलेले हातमोजे, फ्रॉक घातलेल्या बायकांच्या पायांचे क्लोजअप अशी अनेक सेन्सॉरने कापली असती अशी दृश्यं त्या दिवशी सर्वाना दिसली.
उद्घाटन सोहळा संपला. भारताचा जगाच्या यादीत नंबर लागला. श्रीगणेशा झाला. मंचावर अली यावर जंग, वसंतराव नाईक, ए. के. गुजराल, उमाशंकर दीक्षित आणि ज्यांनी भारताला टी.व्ही. ट्रान्समीटर व इतर तांत्रिक बाजूंचा फुक ट पुरवठा केला अशा जर्मनी देशाचे अधिकारी बसले होते. दूरदर्शन मुंबई, आकाशवाणी, फिल्म प्रभाग, कुणीही उद्घाटन सोहळ्याचं रेकॉर्डिग केलं नाही. एक मिनिटाचे बाइट कुणाकडे नाही, ही खेदाची गोष्ट आहे. माझ्याकडे
३ ऑक्टोबर १९७२ च्या सर्व वर्तमानपत्रांची कात्रणे असल्यामुळे एक आणि मी स्वत: संचालन करत असल्यामुळे भारतात दुसरा- माझ्याशिवाय कुणी व्यक्ती नाही- मी ‘आँखों देखा हाल’- म्हणजे कॅमेरा किंवा रंगमंचाच्या पडद्यामागे झालेले हाल फक्त मीच सांगू शकतो.
एका सकाळी एक अत्यंत तरुण मुलगी माझ्या ऑफिसात आली आणि आल्याबरोबर जोरजोराने रडायला लागली. ‘तुम्ही असं का केलं? मी काय गुन्हा केला होता? मी आता जाणार नाही. मला इथेच ठेवा. हँ हँ हँ..’ मी घाबरलो. ही वाक्यं जर परक्या व्यक्तीने ऐकली असती तर म्हणाला असता- बाहेर खेचा त्या . स्त्रीवर कार्यालयात अन्याय – नहीं चलेगा, नहीं चलेगा.. मी तिला विनंती केली.
मी : मेहरबानी करून रडू नका. रडायचं असेल तर हळू. जोरजोरात नको.
ती : मी रडणार. काहीही म्हणू दे लोक.
मी : पण असं झालं तरी काय?
ती : मी निवेदिकेच्या ऑडिशनसाठी आले होते. पण परीक्षक मंडळींनी मला सांगितलं तुम्ही वाईट दिसता. वाईट बोलता- आपण जाऊ शकता, ह्य़ॉ..
मी : थांबा थांबा, चला माझ्याबरोबर.
मी तिला साहेबांकडे घेऊन गेलो. सगळी हकीकत सांगितली. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. मला सांगितलं, ‘याकूब, आपण पुन्हा टेस्ट घेऊ या. कॅमेरासमोर चल.’ आम्ही परत स्टुडिओमध्ये आलो. तिला दिलेला निवेदिकेचा पेपर परत वाचायला लावला. ती ढसाढसा दोन ग्लास पाणी प्यायली आणि नंतर एक गरमागरम चहा घेतला.
‘आता मी वाचू?’ ती वाचायला लागली, वाह अगदी गोड आवाज, सुंदर चेहरा, सुंदर डोळे. तिने एक पान हळू, जोरात, मध्यम स्वरात खर्जमध्ये. सात सुरांपैकी सर्व सूर लावले. साहेब माझ्याकडे पाहत होते.
मी : सर व्हॉट ए फेस, व्हॅट ए वाइस- डोंच्यू अॅरग्री?
साहेब : येस येस याकूब. यू आर राइट, आस्क हर टू कम फ्रॉम टुमारो.
दुसऱ्या दिवशी ती आली, म्हणजे ती रडूबाई ‘दूरदर्शन’च्या इतिहासात आपली नोंद करून गेली. निवेदन, वृत्तवाचन, नाटकांत कामं, आणि फारच अल्प वेळात मराठी, हिंदी, बंगाली, चित्रपटांत, भारतातच नव्हे तर संबंध जगात तिनं आपलं नाव गाजविलं.
ती होती स्मिता पाटील.
आणखी एक घटना. १० जानेवारी १९८१ रोजी दुपारी २ वाजता न्यूज रूममध्ये एक निनावी फोन आला की प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार नर्गिस दत्त यांचं अमेरिकेच्या रुग्णालयात निधन झालं आहे. बातमी पंतप्रधानांपर्यंत पोहोचायला पाहिजे होती.
पी. एम. ओ. दिल्ली कार्यालयामध्ये फोन केल्यावर कळलं की पंतप्रधान आताच मुंबई दौऱ्यावर रवाना झालेल्या आहेत. मुंबई विमानतळावर अंदाजे साडेतीनपर्यंत पोहोचतील. त्यांना कळवावे. त्या काळी मोबाइल नसल्यामुळे ही अरेंजमेंट केली गेली.
मला सांगण्यात आलं की, तुम्ही ही बातमी पंतप्रधानांना विमानतळावर जाऊन द्यावी. मी विमानतळावर आलो. काँग्रेसची सर्व बडी मंडळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जमली होती. मुंबईचे त्या वेळचे मुख्यमंत्री, राज्यपाल त्याचप्रमाणे दिलीपकुमार या सर्वाना ती बातमी दिली आणि त्यांचे बाइट घेतले. त्या वेळचे पोलीस आयुक्त होते राजाध्यक्ष. त्यांनी माझ्याबरोबर दोन इन्स्पेक्टर दिले. मी कॅमेऱ्यासह विमान येण्याच्या ठिकाणी उभा राहिलो. विमान आलं. पंतप्रधान इंदिरा गांधी हळूहळू एक एक पायरी उतरू लागल्या. समोर फक्त मी उभा होतो. त्यांनी विचार केला असेल, बाकीची नेतेमंडळी का दिसत नाहीत, आणि हा कोण उपटसुंभ येथे उभा. त्या खाली उतरल्या. मी माझा परिचय देऊन सांगितलं की मी अत्यंत दुखद बातमी देण्याकरिता उभा आहे. ‘अभिनेत्री नर्गिसजींचं अमेरिकेत निधन झालं.’ त्यावर त्यांनी एवढंच सांगितलं, ‘‘हमे बहुत दुख हुआ.’
एकच वाक्य बोलून त्या पुढे निघाल्या. मी त्यांना विनंती केली, ‘और आप कुछ नही कहना चाहेंगे. माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता त्या पुढे गेल्या. मी सरळ देव आनंद यांच्या ऑफिसात गेलो. त्याचा बाइट घेतला आणि नर्गिसजींच्या बंगल्याबाहेर गाडी उभी केली. त्यांचे नातेवाईक किंवा घरातली मंडळी यांची विचारपूस करावी या हेतूने. तर काय पाहतो समोर! बंगल्याच्या बाहेर संजय दत्त आपल्या मित्रांसोबत चहा पीत बसलेला. मी विचार केला आई वारली आणि हे महाशय येथे मित्रांबरोबर गप्पा काय करत बसलाय. त्यांनी मला पाहिलं.
संजय : कहिये याकूबजी यहा कैसे?
मी : नर्गिसजी की तबीयत के बारे मे पूछने आया था, कैसी है वह?
संजय : उत्तम. फर्स्ट क्लास, आत्ताच मी फोनवर बोललो, आप को बात करनी है- त्याने फोन लावला मी नर्गिसजींशी बोललो.
ऑफिसमध्ये परतलो. आता प्रश्न होता पंतप्रधानांना ‘ही खोटी बातमी होती’ असं कोण आणि कसं कळवणारं आणि कुठल्या तोंडाने. तोपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते. काही मीटिंगमध्ये त्यांनी ही बातमी पत्रकार आणि इतरांना सांगितली. शेवटी साडेसात वाजता त्यांच्या खासगी सचिवाला आम्ही भेटलो. त्यांना कळल्यावर त्या खूप रागवल्या. ‘दूरदर्शन’च्या कारभाराविरुद्ध खूप काही बोलल्या.