कर्जत । कर्जत तालुक्यात तसेच वांगणीबदलापूर दरम्यान प्रचंड धुके रविवारी सकाळी अनुभवायला मिळाले. सकाळपासून असलेले धुके तब्बल दहा वाजेपर्यंत कायम असल्याने सकाळच्या वेळी चालविलेल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल उशिराने धावत होत्या. दहा वाजेपर्यंत धुके दाटलेले असल्याने थंडीची चाहूल की हवामानातील बदल यामुळे असे वातावरण सकाळच्या वेळी निर्माण झाले होते यावर चर्चा सुरू होती.

डिसेंबर महिना संपण्याची वेळ आली तर अपवाद वगळता थंडी जाणवत नव्हती. त्यात समुद्रात निर्माण झालेल्या बदलामुळे थंडी गायब झाली असून नोव्हेंबर नंतर डिसेंबर महिना सरत आला तरी थंडी जाणवत नाही. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार असून त्यावेळी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडतात.

या पर्यटकांना गुलाबी थंडी आगामी काळात अनुभवायला मिळेल असा विश्वास वाटू लागला आहे. या पर्यटकांसाठी आजचा दिवस पुढील आठवडा चांगला थंडीचा असेल याची आठवण करून देणारा ठरत आहे. आज २१ डिसेंबर रोजी सकाळी वातावरणात प्रचंड गारवा दिसून आला. त्यापेक्षा दिवस उजाडला तेंव्हापासून प्रचंड धुके सर्वत्र आढळून येत होते. त्यामुळेखोपोली ते कर्जत या दरम्यानची उपनगरीय लोकलची वाहतूक काहीशी मंदावली होती. खोपोली येथून मुंबई कडे जाणारी सकाळची लोकल २० मिनिटे उशिरा घावत होती. कर्जत येथून मुंबई कडे जाणाऱ्या सकाळच्या सर्व लोकल किमान १५ मिनिटे उशिरा धावत होत्या. पडलेले धुके जे सकाळी दहा वाजेपर्यंत कायम राहिल्याने सकाळी नऊ पर्यंत मुंबई कडे आणि कर्जत कडे जाणाऱ्या उपनगरीय लोकल उशिराने धावत होत्या. त्यात कर्जत पासून बदलापूर पर्यंत प्रचंड धुके असल्याने उपनगरीय लोकल यांची गती मंदावली होती आणि त्या धुक्यातून वाट काढताना उपनगरीय लोकलचे मोटरमन यांच्याकडून गाडीच्या हॉर्नच वापर केला जातहोता. मात्र उशिरा धावत असलेल्या उपनगरीय लोकल यांच्यामुळे सकाळच्या वेळी चाकरमानी यांची धावपळ झाल्याचे चित्र होते.