१४ जुलै कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, व देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत काम केलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
जन्म. १४ जुलै १९२०
मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदापर्यंत काम केलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण हे राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र आणि राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शंकरराव चव्हाण यांनी शून्यातून विश्वथ निर्माण केले. कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख, निष्कलंक चारित्र्य असलेले, दूरदृष्टी आणि विचार यांचा समन्वय साधणारे आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे त्यांचे वैशिष्ट होते.
शंकरराव चव्हाण यांचा शेतकरी कुटुंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल्एल्.बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण रामानंदतीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. १९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बॅंकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
डॉ. शंकरराव चव्हाण यांचा ‘जलसंस्कृतीचे जनक’ असा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांचे नाव ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून घेण्यात येते.पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा शंकररावजींच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, १० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे होती.
शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. जायकवाडी, विष्णुपुरी, इसापूर, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्णा अशा किती तरी प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले. किंबहुना हे प्रकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी त्यांनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचा ‘आधुनिक भगीरथ’ असा गौरवही केला जातो. केवळ मराठवाडा, विदर्भ नव्हे, तर कोकणासारख्या डोंगराळ भागातही पाटबंधारे योजना कशा राबविता येतील, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास शंकररावजींनी केला होता. नर्मदेच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क असल्याचे सर्वांत पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनीच पटवून दिले होते. सचिवालयाचे ‘मंत्रालय’ असे नामकरण शंकरराव चव्हाण यांच्याच कारकिर्दितच झाले. शेतकऱ्यांचे कर्ज पहिल्यांदा माफ करणारे शंकररावजीच.
कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवत असत . राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत असत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे गुणविशेष त्यांच्यामध्ये प्रकर्षाने होते. राजकारण आणि राजकारणी लोकानुनय करण्याच्या दिशेने जातात. लोककल्याणापेक्षा लोकरंजनाला महत्त्व दिले जाते. मात्र, शंकरराव चव्हाण यांचे राजकारण मूल्याधिष्ठित होते. त्यांनी निवडणुकांवर नजर ठेवून कोणतेच काम केले नाही. निष्काम सेवाभाव आणि रचनात्मक कार्य करीत असताना त्यांच्यात कठोर प्रशासकही दिसला. राजकीय सूड, गटबाजी, फोडाफोडी अशा कुप्रथांचा त्यांना तिटकारा होता. राजकीय मतभेद असले तरी त्यांनी मनभेद होऊ दिले नाहीत. विरोधी पक्षातील कार्यकर्त्याला, नेत्यांनाही त्यांनी स्नेहाची वागणूक दिली. राज्याप्रमाणे केंद्रात स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातील कर्तृत्ववान मंत्री म्हणून त्यांनी दिल्लीवरही ठसा उमटविला. शंकरराव चव्हाण यांचे २६ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.