जन्म. २२ जून १९३२ लाहोर येथे.
अभिनेता म्हणून अमरीश पुरी म्हणजे साधेपणा, कामातील वक्तशीरपणा याचा सुंदर मिलाफ, फिल्मी दुनियेत राहूनही ते अतिशय शिस्तबद्ध आणि नातेसंबंध जपणारे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते.
आपल्या मुलांनी सिनेमात काम करू नये अशी अमरीश पुरी यांच्या वडिलांची इच्छा होती. अमरीश पुरी यांचे भाऊ मदन पुरी यांनी सरकारी नोकरी सोडली आणि ते चित्रपटात काम मिळावं म्हणून मुंबईला निघून गेले. अमरीश पुरी यांचे वडिल मात्र दुखावले गेले. आपल्या मुलांनी सरकारी नोकरीच करावी असं त्यांना वाटे. त्याचं सर्वात मोठं कारण होते कुंदन लाल सेहगल. हिंदी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार के.एल.सेहगल हे अमरीश पुरी यांच्या नात्यातील होते. कुंदनलाल सहगल यांचा सुवर्णकाळ त्यांनी पाहिला होता. त्यानंतर उतरती कळा लागल्यावर दिवसरात्र दारू पिऊन अवघ्या ४२ व्या वर्षी प्राण सोडलेले के.एल. सहगलही त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. ते दुःख आपल्या मुलांच्या नशीबी नको हेच कारण होतं.
मोठे भाऊ मदन पुरी यांनी मुंबई गाठली, सिनेमात काम सुरू केलं. मात्र १४ वर्षाचे अमरीश पुरी यांची विचारधारा भिन्न आणि कट्टर होती. त्यांनी फक्त आणि फक्त नाटकावर लक्ष केंद्रीत केलं.
१९५३ साली अमरीश पुरी मुंबईत आले. त्यांचे मोठे भाऊ मदन पुरी यांनी तोपर्यंत सिनेसृष्टीत मोठं नाव कमावलं होतं. पण अमरीश पुरी स्क्रीन टेस्टमध्ये अपात्र ठरवले जायचे. त्यांचं रंग रुप बघून त्यांना कोणी काम देत नव्हतं. फार दिवस भावाकडे ओझं नको म्हणून त्यांनी नोकरी करायला सुरूवात केली. कधीकाळी त्यांनी घरोघरी जाऊन माचिस विकली तर कधी कारकुनी कामं केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी केली. इथेच अमरीश पुरी यांना त्यांची जीवन संगिनी भेटली. कार्यालयात प्रेमसंबंध जुळले आणि वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचा विवाह मराठी कुटुंबातल्या उर्मिला दिवेकर यांच्याशी झाला. पण या संसारी जीवनात सिनेमाची ओढ त्यांची कायम होती. काही वर्षांनी अमरीश पुरी यांची ओळख रंगमंचाचे सम्राट मानल्या जाणाऱ्या इब्राहिम अल्काझी यांच्याशी झाली. ज्या चेहऱ्याला बघून अनेकांनी नाकारलं त्या चेहऱ्याला पहिल्याच नजरेत रंगमंचाचे गुरू अल्काझी यांनी ओळखलं.. पहिलं इंग्रजी नाटक अमरीश पुरी यांना मिळालं. सिनेमातलं करीयर सुरू होण्याच्या १० वर्ष आधी त्यांना पहिलं नाटक मिळालं. त्यानंतर अमरीश पुरींची ओळख सत्यदेव दुबे यांच्याशी झाली. नाटकाचे नियम आवाजाचा उतारचढाव अंगअभिनय अशा अनेक गोष्टी सत्यदेव दुबेंनी अमरीश पुरी यांना शिकवल्या. ३० व्या वर्षी सरकारी नोकरी आणि संसार सांभाळून तितक्याच इमानदारीनं ते नाटकाला समर्पित होते.
रंगमंच्यावरच्या पहिल्या नाटकात मात्र अमरीश पुरी यांच्या अभिनयाची कसोटी लागली. धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या नाटकात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली. अंध व्यक्तीचा अभिनय असल्यानं त्यांना एकदाही पापणी मिटण्याची परवानगी नव्हती. तेव्हा रंगमंच हा उघडा असायचा त्यामुळे हवा आणि डास यांचा उच्छाद तर होताच पण अशा परिस्थितीत एकदाही पापणी न मिटता लांब संवाद त्यांनी लिलया पेलले. सत्यदेव दुबे सांगायचे की “महिलांमध्ये अभिनय शिकण्याची क्षमता अधिक असते. अमरीश थिएटरच्या जगात मला भेटलेली सर्वश्रेष्ट महिला आहे..” अमरीश पुरी यांचा गुरूंनी केलेला हा सन्मान होता. अमरीश पुरी यांना सुरूवातीच्या काळात कोणीही सिनेमात काम देत नव्हतं. अशा वेळी १९६७ साली त्यांना मराठी सिनेमात पहिल्यांदा काम मिळालं. ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. १९७१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी १९७० मध्ये त्यांचा प्रेम पुजारी हा हिंदी सिनेमा आला. नाटकात भूमिका गाजत असल्या तरी रंग रूप बघणाऱ्या बॉलिवुडमध्ये अमरीश पुरी यांना संधी मिळत नव्हती.. १९७० मध्ये म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर त्यांना रोल मिळू लागले मात्र त्यात फारसं काही करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण अर्ध्या दशकानंतर समांतर सिनेमाचा काळ सुरू झाला पुणे एफटीआयआयसोबतच दिग्दर्शक शाम बेनेगल यांनी समांतर सिनेमाची चळवळ उभारली. रंगमंचावरच्या अनेक नवख्या तरूणांना संधी देण्यात आली. त्या गर्दीत अमरीश पुरी होते. बेनेगल यांच्या निशांत, मंथन या सिनेमातून अमरीश पुरी यांच्या अभिनयाचा कस लागला तर गोविंद निहलानी यांच्या अर्धसत्य सिनेमात त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. इथूनच पुढे अमरीश पुरी पर्वाला सुरूवात झाली. कमर्शियल चित्रपटात अमरीश पुरी यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुरू झाली ती १९८१ साली आलेल्या ‘हम पाँच’ या सिनेमानं. त्यानंतर आलेल्या ‘विधाता’ आणि ‘हिरो’ या चित्रपटांनी त्यांना खलनायक म्हणून ओळख दिली. प्राण यांच्यासारखा बंद गळ्याचा सूट घालून हंटर फिरवणारा खलनायक असो वा अमजद खानचा गब्बर असो सर्वांचं मार्केट डाऊन करून अमरीश पुरी यांचा खलनायकी काळ ८० च्या दशकात सुरू झाला. अनेक खलनायक त्यावेळी स्पर्धेत होते पण अमरीश पुरी यांच्यासोर एकही टिकला नाही. मिस्टर इंडिया मधल्या मोगॅम्बोनं अमरीश पुरी यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं. ती अदाकारी बघून प्रेक्षकही म्हणायचे. “मोगॅम्बो खुश हुआ…”
अमरीश पुरी हा एक खलनायकी ब्रँड झाले होते. बॉलिवुड सोडा हॉलिवुडलाही अमरीश पुरींचं आकर्षण होतं. हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरी यांनीच. हॉलिवुडचे महान दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांना ‘इण्डियाना जोंस अँड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमात अमरीश पुरी यांना घ्यायचं होतं. त्यामुळे स्क्रीनटेस्टसाठी अमेरिकेला या असं बोलावणं आलं. मात्र अमरीश पुरी यांनी अमेरिकेत जायला नकार दिला. तुम्हाला मी हवा असेल तर इथे भारतात येऊन स्क्रीनटेस्ट घ्या असं उत्तर अमरीश पुरी यांनी स्पिलबर्ग यांना दिलं. स्पिलबर्ग मुंबईत आले. स्क्रीनटेस्ट घेतली आणि तो रोल अमरीश पुरी यांना मिळाला. १९८४ साली आलेल्या ‘इण्डियाना जोंस एंड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमातला मोलाराम हॉलिवुडमध्येही गाजला. त्यानंतर त्यांना हॉलिवुडमधून अनेक ऑफर्स आल्या पण त्यांना देश सोडून काम करावंसं वाटलं नाही. शाम बेनेगल, गोविंद निहलानी, शेखर कपूर, सुभाष घई, प्रियदर्शन, राकेश रोशन, राजकुमार संतोषी अशा अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं. ज्या सीनमध्ये अमरीश पुरी असायचे तो सीन फक्त त्यांचा असायचा. मग समोर कितीही मोठा कलाकार असो, अमरीश पुरींसमोर करण्यासारखं त्याच्याकडे काही उरायचंच नाही. ८० आणि ९० च्या दशकात अमरीश पुरी यांचे एकामागोमाग अनेक हिट सिनेमे आले. फूल और कांटे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, राम लखन, सौदागर, करण अर्जुन, घायल, गदर, दामिनी, आक्रोश, अर्द्धसत्य, भूमिका, चाची ४२०, घातक, हीरो, कोयला, मंथन, मेरी जंग, मि. इण्डिया, मुस्कराहट, नगीना, फूल और कांटे, राम लखन, ताल, त्रिदेव, विधाता अशी एक ना अनेक नाव घेता येतील. अमरीश पुरी यांचा अभिनय इतका प्रभावी होता की बायका त्यांचा अक्षरशः द्वेष करायच्या. खऱ्या आयुष्यात ते अत्यंत सहृदयी होते. त्यांच्या मुलांचे मित्र घरी यायला घाबरायचे.. पण हळूहळू त्यांच्याविषयीची भीती कमी होत गेली.. तितकेच ते धार्मिकही होते. ऐकुन आश्चर्य वाटेल पण अमरीश पुरी हे आसाराम यांच्या सत्संगात नेहमी जात. अमरीश पुरी एक परीपूर्ण कौटुंबिक व्यक्ती होते. फक्त खलनायकच नाही तर काही सकारात्मक भूमिकाही त्यांच्या गाजल्या.
त्यांचा शेवटचा सिनेमा ‘कच्ची सडक’ होता. तो त्यांच्या निधनानंतर २००६ मध्ये रिलीज झाला होता. अमरीश पुरी लिखित ‘अॅक्ट ऑफ लाइफ’ या इंग्रजी आत्मचरित्र प्रस्तुत पुस्तकाचा अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी समर्पक अनुवाद करून अमरीश पुरी यांचे जीवन चरित्र मराठी वाचकांसमोर आणले आहे. अमरीश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.