जन्म.१४ जुलै १९६७
तिलकरत्ने कोलंबो मधील इसीपथाना कॉलेज तथा डीएस सेनानायके कॉलेज कडून क्रिकेट खेळायचे. १९८६ मध्ये, ते गॅले येथे इंग्लंडच्या ‘बी’ संघा विरुद्ध खेळले होते. या सामन्यात त्यांनी शानदार शतक झळकावले, त्यानंतर शारजाहमध्ये भारताविरुद्ध सामन्यात खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रवेश केला. १९९६ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या विजयात तिलकरत्ने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.तिलकरत्ने यांनी विकेटकीपर म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली. पण काही वर्षानंतर ते एक स्पेशलिस्ट फलंदाज बनले. १९९५ ९६ मध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलकरत्ने हे एक दिवसीय सामन्यात शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरले होते. २००२ मध्ये तिलकरत्ने हे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत शतक ठोकणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू ठरले. तिलकरत्ने २००३ मध्ये श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार बनले. त्यांनी दहा सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून काम केले ज्यामध्ये त्यांना फक्त एक विजय मिळवता आला.
त्यानंतर तिलकरत्ने क्रिकेटमधून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर तिलकरत्ने राजकारणाकडे वळले. त्यांनी श्रीलंकेमधील जुनी पार्टी युनायटेड नॅशनल पार्टीमध्ये प्रवेश केला. तिलकरत्ने यांना २००८ मध्ये एमसीसीची लाइफ मेंबरशिप मिळाली. त्यानंतर त्यांची क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष आणि श्रीलंकेचे स्कोरर म्हणून निवड झाली. २००८ मध्ये त्यांनी श्रीलंका संघाचे व्यवस्थापक म्हणून काम केले होते आणि त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी निवड समिती मध्ये काम केले. २०१७ मध्ये तिलकरत्ने यांनी श्रीलंकेचे फलंदाजीचे कोच म्हणून थोड्या काळासाठी काम केले. पुढे त्यानंतर श्रीलंका अंडर -१९ संघाचे प्रशिक्षक काम केले. आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत तिलकरत्ने यांनी ८३ कसोटी सामन्यांमध्ये ४५४५ धावा केल्या असून त्यात ११ शतकांचा समावेश आहे. तिलकरत्ने हे श्रीलंकेकडून २०० एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्यांनी ३७८९ धावा केल्या आहेत. हसन तिलकरत्ने यांनी कॅंडी टस्कर्सचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांना जुळे मुलगे असून रविंदु आणि दुविंदु तिलकरत्ने हे दोघेही श्रीलंकेच्या अंडर -१९ संघात खेळले आहेत. हसन तिलकरत्ने यांनी श्रीलंकेच्या महिला क्रिकेट टीमचे मुख्य कोच म्हणून काम बघीतले आहे.