खोपोलीत गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन 

खोपोली

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी दु. १२.३० वा वाजता पालिकेच्या र.वा.दिघे वाचनालयाच्या इमारतीत ‘गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,अभ्यासिका आणि ग्रंथालय ’ सुरू करण्यात आले असून छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.त्यामुळे स्पर्धा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गरूड झेप अँपला जोडण्याचे अवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे.

खोपोली नगरपालिकेच्या र.वा.दिघे वाचनालयात सुरू करण्यात आलेल्या गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका आणि ग्रंथालय उद्घाटन प्रसंगी कर्जत उपविभागीय प्रांताधिकारी अजित नैराळे,खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी,खोपोली नगरपालिकेचे प्रशासक,मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या महसूल विभागाचे अधिकारी,पालिकेचे अधिकारीवर्ग तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.अभ्यासिका आणि ग्रंथालय उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले आहे त्यानंतर गरूड झेप अँपशी किती विद्यार्थी जोडलेत याचा आढावा जिल्हाधिकारयांनी घेतला.

कोकणातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांमध्ये फारसा सहभाग दिसून येत नाही, त्यामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत प्रशासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण नगण्य असते. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनाचा अभाव यास कारणीभूत ठरतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘गरुडझेप’ उपक्रम सुरू केला आहे. यात विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असल्याचे माहिती प्रस्ताविकातून प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी दिली.

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना घरची आर्थिक परिस्थितीमुळे आडचण येते, अभ्यास करण्यासाठी एकांत जागा नसते,स्पर्धा परिक्षा केव्हा असतात याचा वेळापत्रक माहिती नसणे,कोणती पुस्तके वाचली पाहिजेत,कोणाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे याबाबतची माहिती नसते तसेच खासगी मार्गदर्शन केंद्रात खर्च करता येत नाही यामुळेच रायगड जिल्ह्यात गरूड झेप अँपची निर्मिती केल्यामुळे आमचे प्रशाकिय आधिकारी आणि विद्यार्थी यांचा संवाद साधत परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळेच प्रशासनाच्या माध्यमातून ग्रंथालय, अभ्यासिका सुरू केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरांनी सांगत खोपोलीत सुरू केलेल्या उत्तम ग्रंथालयाच्या बाबत प्रांताधिकारी अजित नैराळे,खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी,खोपोली नगरपालिकेचे प्रशासक,मुख्याधिकारी अनुप दुरे यांचे कौतुक केले.

डॉ. महेंद्र कल्याणकरांनी रायगड जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यावर नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या असून आदिवासी बांधवासाठी सप्तसुत्री कार्यक्रम सुरू केला आहे.गरूड झेप अँपची निमिर्ती केल्यावर खालापूर तालुक्यातील ४५० विद्यार्थी जोडले गेल्याची माहिती तहसिलदार आयुब तांबोळी यांनी देत उपस्थितांचे आभार मानले.