विनोदी कथालेखन आणि बालसाहित्यात मुशाफिरी करण्याबरोबरच व्यंगचित्रकलेविषयी आस्वादक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका-कथाकथनकार शकुंतला फडणीस या माहेरच्या शकुंतला बापट. प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या त्या पत्नी होत. शि. द. फडणीस आणि शकुंतला फडणीस ही सृजनांची जोडी म्हणजे पुण्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक विश्वातील शान होती.
शकुंतला फडणीस यांची कथा, ललित गद्य, संपादन, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमधील तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक वर्षे बालकुमारांसाठी लेखन करून त्यांनी बालसाहित्याला वेगळा आयाम दिला. मुलांसाठी दर्जेदार विनोदी कथा लिहिल्या. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात होणाऱ्या त्यांच्या कथाकथन कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असे. अखिल भारतीय मराठी बालकुमार संमेलन या संस्थेच्या पहिल्या शंभर सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. संस्थेला सुरुवातीच्या काळात त्यांनी आर्थिक मदत केली. मुलांसाठीची पुस्तके बागेत आणि रस्त्यावर विकण्याच्या संस्थेच्या उपक्रम त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या त्या आधारवड होत्या. शि. द. फडणीस यांच्या सर्व उपक्रमात शकुंतला यांनी मोलाची साथ दिली. शकुंतला फडणीस यांच्या साहित्याला राज्य सरकारच्या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासह तीन पुरस्कार तसेच पुणे महापालिकेचे आणि इतर अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. बापट कुल मंडळ, यशवंत वेणू पुरस्कार, मालतीबाई दांडेकर पुरस्कार व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. भूकंप अभ्यासक अरुण बापट हे शकुंतला यांचे धाकटे बंधू होत. शकुंतला फडणीस यांचे १६ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.
शकुंतला फडणीस यांचे लेखन.
सोन्यासारखी संधी,कौतुकाचा गंगाराम,आजीचा धडा आणि इतर कथा,पत्राचा प्रवास आणि इतर कथा,पैज जिंकली छोट्यानं आणि इतर कथा,सांग ना ग आई,चमचम घागर,लठंभारती,खमंग धडा व मी आणि हसरी गॅलरी.




















