जन्म.३० जून १९२८ आंध्रप्रदेशात श्रीकाकुलम जिल्ह्यातील उर्लम गावी.
सोमयाझुलु हे तेलगू चित्रपट आणि काही तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जाणारे अभिनेता होते.जोन्नालगड्डा वेंकट सोमयाझुलु हे त्यांचे पूर्ण नाव. १९८० मध्ये, त्यांना तेलुगू क्लासिक चित्रपट ‘शंकरभरण’ (शंकराचे अलंकार) मधील त्यांच्या कामासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. संगीताला वाहुन घेतलेल्या एका शास्त्रीय गायकाची ती कथा होती.भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त, फोर्ब्सने शंकरभरण हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील २५ सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ठरवला आहे.’शंकराभरणम’ या तेलूगु चित्रपटावर आधारित गिरीश कार्नाडांचा ‘सूरसंगम’ हा चित्रपट आला होता.
त्यांनी के विश्वनाथ दिग्दर्शित मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी अभिनत जग उठा इंसान या हिंदी चित्रपटातही काम केले होते. त्यांनी सदमा, जाग उठा इन्सान, प्यार का सिंदूर, प्रतिबंध, फिर मिलेंगे, भागामती अशा काही हिंदी चित्रपटातही काम केले होते. श्री राघवेंद्र या तमिळ चित्रपटात त्यांनी श्री राघवेंद्र गुरुंची भूमिका साकारली होती.तसेच त्यांनी कन्यासुलकम नाटकावर आधारित १३ भागांची दूरदर्शन मालिका बनवली. पुढे जे व्ही सोमयाझुलु यांनी अभय चरण या चरित्र मालिकेत एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची भूमिका साकारली. हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांमध्ये तेलुगू रंगभूमीच्या विकासासाठी, जे व्ही सोमयाझुलु यांनी त्यांच्या समकालीन सहकाऱ्याच्या सोबत ‘रसरंजनी’ ची स्थापना केली. अभिनय करत असताना ते सांस्कृतिक कार्य संचालनालयात काम करत असत.त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणुन कामही केले.
जे व्ही सोमयाझुलु यांचे २४ एप्रिल २००४ रोजी निधन झाले.