कर्जत । नेरळमधील एका जिल्हा परिषद शिक्षकाच्या घरात १४ नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती. साधारण पाच लाखांचे दागिने यांची चोरी झाल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी ५० ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरी झालेला ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. दरम्यान, अटकेतील दोन्ही चोरटे सराईत असून, त्यांच्यावर नवी मुंबईत १३ तर ठाणे, पालघर, नाशिक अशा ठिकाणी देखील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

१४ नोव्हेंबर रोजी नेरळ येथील पियुष अपार्टमेंटमध्ये राहणारे, पेशाने शिक्षक असलेले संतोष हिंमतराव कोळी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यांच्या घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या आतील लॉकरमधून अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याची नोंद नेरळ पोलीस ठाणेत करण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक तयार करण्यात आले. या पथकानेगुन्ह्याचे आजूबाजूस आणि जाण्या-येण्याचे मार्गावरील ४० ते ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमध्ये त्यांना यश येऊन गुन्ह्यातील आरोपी हा भिवंडी येथील राहणारा असल्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकालासमजले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती काढून शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख (वय ४६, रा. घुंगटनगर, भिवंडी) याला ४ डिसेंबर रोजी १ वाजून १४ मिनिटांनी त्याच्या घरातून अटक केली. नंतरपोलीस खाक्यामुळे गुन्ह्यातील काही मुद्देमाल शफीकने सोने व्यापारी रमेश गोपाल सोनी (वय ३६, काळूबाई चौक, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) याला विक्री केले असल्याचे सांगितले.

पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी ४.१५ वाजता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आतापर्यंत १ लाख २९ हजार ७०० रुपये किंमतीचे २६.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता आरोपी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख याचेविरूध्द यापूर्वी १८ घरफोडी चोरीचे गुन्हे तर रमेश गोपाल सोनी याच्यावर सहा चोरीच्या मालमत्ता घेण्याचे गुन्हे दाखल आहेत. शफीक शेखवर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे येथे १३ तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि दमण येथे देखील गुन्हे दाखल आहेत.

नेरळ पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी टेळे यांचे मार्गदर्शन घेवून नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक संदिप फड, तसेच पोलीस हवालदार सचिन वाघमारे, राजेभाऊ केकाण, अनुया बेद्रे, निरंजन दवणे, विनोद वांगणेकर यांनी उत्कृष्ट तपास यंत्रणा हाताळून गुन्ह्याची उकल केली आहे.