कर्जत । तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या माणगाव वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. माथेरानकडे जाणाऱ्या जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी मिळत असते, मात्र माथेरान येथे जाणारी जलवाहिनीमधून पाणीपुरवठा होत नसल्याने माणगाव वाडीमधील ग्रामस्थांचे तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, या ग्रामस्थांना सध्या डवऱ्याचे पाणी हंड्यात साठवून आणावे लागत आहे.

माणगाव वाडीमध्ये ६० घरांची वस्ती आहे. नेरळ माथेरान घाट रस्त्यात माणगाव वाडी ही आदिवासी वाडी असून माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमधील भाग आहे. या गाडीच्या बाजूने माथेरान या शहरासाठी जाणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे.स्थानिक आदिवासी लोकांनी जलवाहिनी टाकण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या आणि त्याबदल्यात वाडीमधील ६० घरांसाठी पिण्याचे पाणी यांची तरतूद करून घेतली. त्या जलवाहिनीमधून पाणीपुरवठा या आदिवासी वाडीला होत असतो आणि वाडीमध्ये असलेल्या प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर वाडीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी एक विहीरदेखील असून त्या विहिरीचे पाणी ग्रामस्थ वापरत असतात. मात्रगेल्या १५ दिवसांपासून केवळ दोनच दिवस माणगाव वाडीमधील नळाला पाणी आले आहे.

माथेरानला जाणाऱ्या नळपाणी योजनेचे उल्हास नदी येथून माथेरानकडे जाणारे पाणीपुरवठा यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. त्यात केवळ दोनवेळा नळाला पाणी आले असल्याने माणगाव वाडीमधील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नळाला पाणी येत नसल्याने शेवटी ग्रामस्थ डोक्यावर हंडे घेवूनमाथेरान घाट रस्त्यावर चालत येतात. त्या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या मागे एक झरा असून त्या झऱ्यामध्ये साचणारे पाणी येथील आदिवासी महिला साठवून घरी घेवून पिण्याच्या पाण्याची तहान भागवत आहेत.