कर्जत । जीवनातील प्रत्येक गोष्टींबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपण निश्चितच यशाची उत्तुंग भरारी घ्याल. तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग तुम्हालाच निर्माण करायचा आहे. त्याकरिता मोठा विचार करा आणि तुम्ही विचार सक्षम, सकारात्मक व सकारात्मक कृती करून त्यात सातत्य ठेवल्यास सकारात्मक व तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील. असा सल्ला उत्तुंग भरारीचे प्रेरणादायी वक्ते नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्यावतीने फार्मसी डिप्लोमा, फार्मसी डिग्री आणि एम फार्म या विभागाच्या पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रेरणादायी वक्ते नितीन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रदीपचंद्र शृंगारपुरे, महाविद्यालयीन समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, डॉ. अमोल चांदेकर, डॉ. निलोफर खान, पालक प्रतिनिधी सुधीर चव्हाण, विभावरी इंगळे आदी उपस्थित होते. डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात महाविद्यालयाचा चढता आलेख सादर केला.