प्रत्येक होणारा चमत्कार व त्यामागील शास्त्रीय कारण असते.आध्यात्मिक बुवाबाजी, अंगात येणे, भूत असतो की नसतो ?अशा विविध विषयांवर आदिवासी बांधवामध्ये जनजागृतीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखा व आदिवासी विभाग पेण यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या अंतर्गत गोळेवाडी आदिवासी वाडी, खानाव, खालापूर येथे बुवाबाजी, चमत्कार व त्यामागील विज्ञान हा उपक्रम व व्याख्यान संपन्न झाले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही रायगड जिल्ह्यातील विविध आदिवासी वाड्यांवर जनजागृतीचे उपक्रम घेत आहे. या उपक्रमाची संकल्पना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मा. शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे अधिकारी भानुशाली यांचे सहकार्याने उपक्रम राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा खोपोली यांनी गोळेवाडी आदिवासी वाडी, खानाव, खालापूर येथे कार्यक्रम घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामसेवक पोफेकर यांनी उपस्थित सभासद यांचे स्वागत केले. त्यानंतर युवा विभाग प्रमुख रोहन दळवी यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्पाची माहिती व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महा अंनिस खोपोली शाखेची ओळख शाखा अध्यक्ष डॉ सुभाष कटकदौंड यांनी केली.
आपण आदिवासी लोकांच्या विविध समस्या,आरोग्य, स्वच्छता, विविध तंत्रज्ञान यांचा फायदा त्यांना समजावून सांगण्यात आले. त्याच बरोबर त्यांना काही वैज्ञानिक प्रयोग जसे रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे, पेटता कापूर खाणे, कोणत्याही इंधन व आगी शिवाय हवान पेटवणे असे विविध चमत्कार करू दाखवण्यात आले. प्रत्येक होणारा चमत्कार व त्यामागील शास्त्रीय कारण सुद्धा सांगण्यात आले. याच बरोबर आध्यात्मिक बुवाबाजी, बुवाबाजी, अंगात येणे, भूत असतो की नसतो ?अशा विविध विषयांवर व्याख्यान देण्यात आले. रायगड जिल्हा प्रधान सचिव संदिप गायकवाड, शाखा सचिव महेंद्र ओव्हाळ यांनी विविध चमत्कार व त्यामागील विज्ञान स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी महा अंनिस रायगड जिल्हा अध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी थोडक्यात आभार व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी विविध उपक्रम प्रमुख दयानंद पोळ, बुवाबाजी संघर्ष शाखा कार्यवाह सुनील जगताप, जोविनी प्रमुख प्रमिला पाटील व वाडीतील महिला, पुरुष व छोटी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.