राज्य सरकार शिक्षकांचे प्रश्न कायम अनुत्तरित ठेवत असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा भोडण्यासाठी पुण्याच्या भिडे वाड्यापासून मंत्रालयापर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शिक्षक मतदार संघाच्या चार आमदारांनी पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ही दिंडी जवळपास अर्धा टप्पा पार करून बुधवारी खोपोलीमध्ये दाखल झाली असता के.टी.एस.पी. मंडळ आणि पुरोगामी शिक्षक संघटनेने स्वागत केले आहे.
शिक्षक मतदार संघ कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे किशोर दराडे,पुणे विभागाचे दत्तात्रय सावंत आणि अमरावती विभागाचे श्रीकांत देशपांडे यांच्या समवेत आंदोलनकर्ते खोपोलीमध्ये दाखल झाल्यानंतर जनता विद्यालयाच्या प्रांगणात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम,कार्यवाह किशोर पाटील,के.एम.सी.महाविद्यालयाचे अध्यक्ष राजू अभाणी,जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव,शिशु मंदीर शाळेचे अध्यक्ष विजय चुरी, दिलीप पोरवाल,अबूशेठ जळगांवकर, भास्कर लांडगे, पुरोगामी शिक्षक संघटना खालापूर तालुकाध्यक्ष के.एम.गोरे, आणि संस्थेच्या पदाधिकार्यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की पुण्याच्या प्रसिद्ध भिडे वाड्यापासून मंत्रालयापर्यंत पायी दिंडीच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही निकाराचा लढा देण्यास सज्ज झालो आहोत. महाराष्ट्रातील जवळपास ६० ते ७० हजार शिक्षक शासनाच्या उदासीनतेमुळे वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाकडे पायी दिंडीच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या प्रमुख सहा मागण्यांसाठी संघर्ष सूरू असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आम्हाला आहे. मात्र ठोस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आमदार किशोर दराडे आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आणि न्याय हक्कासाठी पुणे ते मंत्रालय अशी पायी दिंडी हा चळवळीचा नव्हे तर लोकशाहीमध्ये आपला लढा जगासमोर आणण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यात यश मिळेल असा आशावाद सर्व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. खोपोली शहरातील पुरोगामी शिक्षक आणि शिक्षकेत्तर संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.