चौक,
२४ एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून या परिसरातील ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात आला. जनजागृती होऊन देखील जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शासकीय योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील असे दिसते.
२४ एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने गावात साजरा केला जातो, परंतु अनेक ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत ग्रामस्थांची उपस्थिती खूपच कमी असते,त्यात लोकप्रतिनिधी यांचाही समावेश असल्याने गावच्या विकासात अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
१९९२ साली पंचायत राज मध्ये दुरुस्ती झाल्यावर २४ एप्रिल २०१० मध्ये पहिला पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला. केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना मध्ये सुधारणा करण्याचे ठरवले असून सन २०२२-२३ पासून शाश्वत विकास करण्यासाठी व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने गरिबीचे उच्चाटन,पृथ्वीचे रक्षण व २०३० पर्यंत जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी होणाऱ्या करारावर भारतदेश सही करणारा देश आहे. गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव,आरोग्यदायी गाव,बालस्नेही गाव,जलसमृद्ध गाव,स्वच्छ व हरित गाव,पायाभूत सुविधायुक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्टीने सुरक्षित गाव,सुशासन युक्त गाव,लिंग समभाव गाव.अशी नऊ ध्येय गाठण्यासाठी नऊ पैकी एक ते तीन ध्येयाची निवड आजच्या ग्रामसभेत करून वर्षभर त्याची प्रभावीअंमलबजावणी करण्याचे आहे.
त्यामुळे भविष्यात गाव समृद्ध तर होईलच पण याच माध्यमातून गावे जगाच्या नकाशावर येतील,यासाठी प्रशासनाला ग्रामस्थांची साथ अपेक्षित आहे.ग्रुप ग्रामपंचायत कलोते,ग्रुप ग्रामपंचायत आसरे,ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले,ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली, ग्रामपंचायत वावंढळ,ग्रुप ग्रामपंचायत चौक, ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव,ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव,ग्रामपंचायत वरोसे येथे ग्रामसभा झाल्या.
विस्तार अधिकारी महादेव शिंदे,शैलेंद्र तांडेल,ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गोलार,सचिन कुराडे,संतोष पवार,संजय पोळ,एस.पी. जाधव,संभाजी केंद्रे आदी अधिकारी वर्ग यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.