महसूल दिनी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांचा गुणगौरव जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते अलिबाग येथे करण्यात आला.
परिवारात काम करताना एकजूटीची भावना महत्वाची असून त्याच भावनेतून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून कोणतेही काम यशस्वी होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.
महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महसूल विभागावरील विश्वास स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही कायम आहे. कोणताही विषय तडीस नेण्याची क्षमता महसूल विभागात आहे. आपल्या विभागासाठी लोकभावनेतून, लोकोपयोगी काम करण्याचा आज संकल्प करायला हवा. आपल्या शासकीय कारकिर्दीत जनतेच्या दृष्टीने उत्कृष्ट काम करण्याचे आपले ध्येय ठरवायला हवे. आजचा दिवस महसूल विभागासाठी निश्चितच महत्वाचा असून तो सर्वांनी मिळून साजरा करायलाच हवा, मात्र हा दिवस साजरा करताना आपल्यावर सामाजिक जबाबदारीही तितकीच आहे, ही जाणीव महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने बाळगणे आवश्यक आहे.
विविध विषयात कोकण विभागात रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर हे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे सामूहिक यश आहे, याबाबत अभिनंदन करून जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर पुढे म्हणाले की, दिलेल्या जबाबदारीला नाही म्हणू नये. कोणतेही काम करण्यास महसूल यंत्रणा समर्थ आहे म्हणूनच आपल्याकडे जबाबदारी येते, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. आजचा काळ विकासाचा काळ आहे. प्रत्येक नागरिकाला सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातून मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करता येत नाही. डिजिटायझेशन प्रक्रिया देखील महसुली यंत्रणेमुळे यशस्वी ठरली आहे. येत्या काळात तांत्रिकदृष्ट्या साक्षर होणे, डिजिटायझेशन आत्मसात करणे सर्वांना गरजेचे आहे. कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी त्या कामाशी प्रामाणिक राहून कामांचा क्रम निश्चित करावा. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे.
शासकीय कर्तव्य बजावित असताना या स्पर्धात्मक जगात आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगून प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा, कुटुंबाला वेळ द्यावा, आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावा, शिकायला लाजू नये, अभ्यास करावा, शिकाल तितके मोठे व्हाल, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, सकारात्मक विचार करावा, असा मोलाचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
तहसीलदार आयुब तांबोळी हे २० सप्टेंबर २०२१ रोजी खालापूर तहसिलदार म्हणुन हजर झाले.शासनाच्या १ ऑगस्ट ते ३१ जुलै या महसूल वर्षांत त्यांची प्रशासनातील कारकीर्द यशस्वी राहिली आहे.अनेक उपोषण त्यांनी त्यांच्या पद्धतीने हाताळून लोकांच्या समस्या मार्गी लावल्या आहेत. तालुक्यात शांतता प्रस्थापित व ती कायम रहाण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे.सर्वात महत्वाचे जिल्हयातील सर्वात जास्त महसूल वसुल करून शासनाला सहकार्य करणे, शासनाच्या जनकल्यांनकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देणे, शैक्षणिक सुविधा साठी मोफत दाखले वाटप केले, दरडग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करणे,आपत्ती पूर्व व्यवस्थापन करणे असे अनेक महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष देऊन तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केला.विशेष म्हणजे अनेक वर्षांनी खालापूर तालुक्याचा गौरव होत असल्याने अनेकांनी तहसीलदार आयुब तांबोळी यांचे अभिनंदन केले आहे.





















