भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामले मामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली.आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९१ वर्ष होत आहेत.
१९२९ ते १९३२ ह्या दरम्यान प्रभातकारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली. तर १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ ह्या बोलपटाची निर्मिती केली. आजमितीस भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. १९३४ साली प्रभातचं पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झालं. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्याकाळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ ची ख्याती होती.
१९३२ ते १९३४ दरम्यान ‘प्रभात’ने ६ बोलपटांची निर्मिती केली. प्रभातचे नाव सिनेजगतात आणि रसिकांमध्ये सुपरिचित झालं. तर १९३३ मध्ये ‘प्रभात’ने भारतातील पहिला रंगीत बोलपट ‘सैरंध्री’ निर्माण केला. आजमितीस २०१९ साला मध्ये सदर ‘प्रभात’ च्या वास्तू मध्ये ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ मोठ्या दिमाखात उभी आहे. तेथील विद्यार्थी आम्हाला भेटतात तेव्हा प्रत्येकजण भारावल्यासारखा बोलतो. कौतुक आणि आदराने सगळेजण बोलतात ते ‘संत तुकाराम’ बद्दल. आणि १९३४ साली दामले मामांनी कोणत्या विचारानी हा स्टुडिओ उभारला? त्यांना शतश: प्रणाम.
१९३४ ते १९५७ हा ‘प्रभात चा पुण्यातील कालखंड. त्या दरम्यान २६ बोलपटांची निर्मिती झाली.पैकी ९ बोलपटांनी इतिहास घडवला. जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये ह्या बोलपटांची दखल घेतली गेली.
१९५७ साली प्रभात बंद झाली. १९५७ ते १९५९ ह्या कालावधीत एस.एच केळकर ह्यांनी प्रभात चालवली. पुढे १९६१ साली भारतीय सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ची स्थापना झाली. दामले मामांचे एक स्वप्न होतं की ‘प्रभात’मध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण द्यावं. प्रभात मध्ये हे साध्य झालं नव्हते, पण त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये ‘एफ. टी.आय.आय’ दिमाखात उभं आहे.
१९५७ साली ‘प्रभात’ च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे हक्कही विकले गेले. ‘प्रभात’ चा हा सर्व अमूल्य खजिना हळुहळू पडद्यामागे जाऊ लागला. भारतीय चित्रपटांचा हा इतिहाससुद्धा पुसट होत गेला. एक वेळ अशी आली की, ‘प्रभात’चे हे जगविख्यात चित्रपट पहायचे कसे? १९६९ साली उत्तम योग जुळून आला. माझे वडिल अनंतराव दामले ह्यांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगाव सदर चित्रपटांचे आठवड्याच्या आठवडे प्रदर्शन होऊ लागले. रसिकांना हा ठेवा परत मिळाला. ‘प्रभात’ पर्वाची परत सुरुवात झाली. बदलत्या काळानुरूप व्हिडिओ, डीव्हीडी आम्ही दामले कुटुंबियांनी बनवल्या. ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ फोटो,कागदपत्रे चित्रपट ह्या सर्व ठेव्याचं डीजीटायझेशन व संवर्धनाचे काम आम्हा दामले कुटुंबियांतर्फे आजमितीस सुरु आहे.
अरुणाताई दामले (माझ्या आई) यांनी अनेक वर्ष प्रभात गीते कार्यक्रम सादर करून प्रभातच्या अवीट गाण्यांचा आस्वाद रसिकांना दिला. अरुणाताईंनी लिहिलेल्या ‘मराठी चित्रपट ‘संगीताची वाटचाल’ ह्या अभ्यास ग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दामले कुटुंबियांतर्फे निर्मित दोन माहितीपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘इट्स प्रभात’ हा माहितीपट ‘प्रभात’च्या ७५ व्या स्थापनेच्या वर्धापन वर्षी म्हणजे २००४ साली निर्माण केला होता. तर २०१२ साली ‘विष्णुपंत दामले’ बोलपटांचा मुकनायक हा माहितीपट निर्माण केला. प्रभातची धुरा पुढे नेताना ह्या तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
अलीकडे नव ‘प्रभात स्टुडिओ’ ह्या नावाने सुरु केलेल्या उपक्रमांमार्फत माहितीपटांचं संकलन केलं जातं आहे. प्रभातकारांनी १५ लघुपटांची / माहितीपटांची निर्मिती केली होती. त्यापैकी काही लघुपट जतन करून आम्ही त्याच्या डीव्हीडी तयार केल्या आहेत. एक काळ असा होता की, चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारास तंत्रज्ञांना ‘प्रभात’ मध्ये काम मिळवून काही तरी नवीन शिकायला मिळेल. ह्यासाठी यावसं वाटायचं. प्रभातकारांनी अनेक सामान्य माणसांतून अचूक निवड करून अनेक कलाकार घडवले. ही एक चित्रपटक्षेत्रास ‘प्रभात’ने दिलेली देणगीच होती. देव आनंद या सुप्रसिद्ध कलाकाराचं चित्रपटसृष्टीत पदार्पण १९४६ साली प्रभातच्या ‘हम एक है’ ह्या चित्रपटातून झालं.
५/६वर्षापूर्वी आम्ही ‘मादागास्कर’ बेटावर गेलो होतो. तेथील विशेष प्राणी ‘लेम्युर’ पहाण्यास एका अभयारण्यात गेलो. तिथे ‘लेम्युर’ प्राण्यावर थ्री.डी फिल्म बनवण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यामुळे तीन दिवस तेथे जाण्यास कोणालाच परवानगी नव्हती. आम्ही खजिल झालो. तेव्हा माझी पत्नी तेथील एका महिला अधिकाऱ्यास म्हणाली आम्ही भारताहून हा खास प्राणी पाहण्यास आलो आहोत. माझा नवरा अनिल दामले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहे. त्याच्या आजोबांनी ‘संत तुकाराम’ ‘संत ज्ञानेश्वर’ असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ते ऐकून ती महिला (तीच नाव पॅट्रोशीया राईट)खुर्चीत उठून उभी राहिली. मोठ्या आदरपूर्वक आवाजात म्हणाली आमच्या केलीफोर्निया येथील फिल्म मेकिंग कोर्समध्ये प्रभातचा ‘संत तुकाराम’ हा चित्रपटांत प्रथम दाखवतो. तुम्ही त्या प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहात म्हणत तिचा एक सहकारी आमच्याबरोबर दिला. व अभयारण्यात जाण्याची परवानगी दिली. प्रभात महिमा अजूनही टिकून आहे. आणि तो असाच कायम राहील कारण ‘प्रभात’च्या त्या अजरामर कलाकृती !
प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की, देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’.
अनिल दामले