जन्म. २२ नोव्हेंबर १९१९
‘घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात…’ असे हळूवारपणे लिहिणारे कृष्णाजी बळवंत उर्फ कृ.ब.निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
कृ.ब.निकुंब बेळगावमधल्या लिंगराज महाविद्यालयात ते मराठी विभागप्रमुख आणि मराठीचे प्राध्यापक होते. कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब प्रयत्न करायचे.
त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्वचरी सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून निकुंब समजावून द्यायचे. कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले हे गाणं रेडीओवर हे गाणं लागलं की सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत. मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. निकुंब यांचे ३० जून १९९९ रोजी निधन झाले.