जन्म. १५ एप्रिल १९५२
‘बीज अंकुरे अंकुरे ….. ओल्या मातीच्या कुशीत’ या गीताने ‘दूरदर्शन’ वर गाजलेल्या ‘गोट्या’ मालिकेला प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या गीताचे गीतकार एकापेक्षा एक अजरामर गीतांनी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान देणारे मधुकर आरकडे उत्कृष्ट चित्रकार तसेच संगीतकार देखील होते.
मधुकर आरकडे यांचा जन्म एका सामान्य रेल्वे कामगाराच्या घरात झाला. आपलं सर्व आयुष्य मुंबई शहरात जगले असले तरी, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्या जवळील ‘अडुळ’ ह्या आपल्या मूळ गावाला ते विसरले नव्हते. सह्याद्रीचा हिरव्यागार कुशीत विसावलेली ही भूमी त्यांना सतत साद घालत असे. गावाकडच्या संस्कृतीची पुरेपूर ओळख आणि शहरातील धकाधकीच्या जीवनाची पुरेपूर जाणीव पुढे त्यांच्या लिखाणात दिसते. त्यामुळे त्यांच्या लिखाणात खरेपणा जाणवतो.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून झाले. ते एक अप्रतिम चित्रकार सुद्धा होते. मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत अनेक वर्षे त्यांनी कला शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे ते आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त गीतकार, कवी आणि गायक म्हणून प्रसिद्धीस आले.
आपल्या चित्रकलेचा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला. अनेक पुस्तकांचे, काव्यसंग्रहांचे मुखपृष्ठ त्यांनी रेखाटले आहेत. त्यातील प्रमुख ऋतुरंग, बीज अंकुरे अंकुरे, अभिसारिका, कवितारंग आणि कल्पवृक्ष यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
आपल्या प्रतिभेचा जोरावर एक दशकभर दूरदर्शनवरील विविध मालिकांचे शीर्षकगीत लिहिणारे गीतकार म्हणून ते गाजले. होळी रे होळी, जुईली, गोटय़ा, अक्षरधारा, द्रष्टा ह्या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. त्यांनी स्वतःचा मराठी त्यांनी ‘बीज अंकुरे अंकुरे’ हा वाद्यवृंद(ऑर्केस्ट्रा) उभा केला होता. त्यामध्ये ते स्वतः बीज अंकुरे अंकुरे ही गीत गायचे. गाणं सूर आणि तालबद्ध असावं त्यासाठी त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं होतं तसेच गाण्याची त्यांना खूप आवड होती, असं ते नेहमी सांगायचे. त्यांच्या गाण्याच्या अनेक सीडी बाजारात आल्या होत्या त्यामध्ये मध्ये अनेक गाणी त्यांनी स्वतः गायली आहेत. ती ऐकताना त्यांच्यातील गायक सुद्धा मनाला भुरळ पाडतो. त्यांच्या ‘बीज अंकुरे अंकुरे’ या अल्बमला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यांचा ‘अभिसारिका’ हा गीतसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला होता.’आम्ही बोलतो मराठी’, ‘बंदिवान मी या संसारी’, जन्म, ‘दुसऱ्या जगातली’, ‘रामायण’ या प्रसिद्ध चित्रपटातील गीतेही त्यांच्या लेखणीतून उतरली होती.
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने त्यांचा यथोचित सत्कार करून इयत्ता सातवीच्या मराठी पुस्तकात त्यांच्या बीज अंकुरे अंकुरे या गीताचा समावेश केला होता.
त्यांनी स्वतःच्या आठवणींचा संग्रह लिहायला घेतला होता पण त्यांच्या अचानक जाण्याने तो त्यांच्या हयातीत प्रकाशित झाला नव्हता. पुढे तो ‘स्मृतीगंध’ नावाने प्रसिद्ध करण्यात आला. मधुकर आरकडे यांनी आपल्या स्मृतिगंध पुस्तकात आपल्या आजोळबद्दल, ज्यात तिथली माणसं, जिसर्ग वातावरण ह्याची वर्णनं तेथील विलक्षण शब्दकळेसह उभी केली आहेत. त्यांचे अनेक वर्षे डोंबिवलीत वास्तव्य होते. मधुकर आरकडे यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.





















