जन्म. २९ जून १९४४ पुणे येथे.
नृत्याच्या अदाकारीने ब्लॅक अँड व्हाईट जमानाही रंगीन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जीवनकला केळकर यांनी आज पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं आहे… पण त्यांच्यावर चित्रीत झालेलं ‘पारसमणी’ सिनेमातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा…’ हे गाणं मात्र आजही त्यांच्याप्रमाणेच चिरतरुण आहे…
दत्तोबा कांबळे व गंगूबाई कांबळे या कलावंत दांपत्याच्या पोटी जीवनकला यांचा जन्म पुणे येथे झाला. गंगूबाई यांनी एकेकाळी मूकपटाचा काळ गाजवला होता. ‘फिअरलेस नादिया’चा उदय होण्यापूर्वी गंगूबाई तशाच प्रकारची चित्तथरारक कामे करीत. त्यामुळे त्या काळात ‘स्टंट क्वीन’ असा त्यांचा लौकिक झाला होता. पुढे बोलपटातूनही त्यांनी कामे केली. वडील दत्तोपंत हेही चित्रपटात कामे करीत.
मंगेशकर कुटुंबाने सुरू केलेल्या ‘सुरेल बाल कला केंद्र’मध्ये अनेक बाल कलाकार कामे करीत असत. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत कुडाळकर, प्यारेलाल शर्मा, कल्याणजी, आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, कुमारसेन गुप्ते, अरविंद मयेकर, अशी पुढे मोठेपणी नाव झालेली कलावंत मंडळी त्यात होती. छोट्या जीवनकलाही सुरेल बाल कला केंद्रात नृत्य करीत असत. तेव्हापासून जीवनकला मंगेशकर कुटुंबातल्याच झाल्या.
१९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अखेर जमलं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. वसंत शिंदे, सूर्यकांत, बेबी शकुंतला, यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात राजा गोसावी व शरद तळवलकर या विनोदी अभिनेत्यांनी प्रथमच भूमिका केली होती. त्याचप्रमाणे ‘बेबी जीवनकला’ या नावाने जीवनकलाही या चित्रपटात बालतारका म्हणून चमकल्या. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत ‘नृत्यांगना’ म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांत कामे केली. हेलन, जयश्री टी, बेला बोस, अशा अनेक नृत्यांगनांच्या बरोबरीने जीवनकला यांनी अविस्मरणीय नृत्ये केली.
१९६० साली ‘संगत जडली तुझी नि माझी’ या प्रभाकर नायक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात जीवनकला यांचे नायक राजा गोसावी असूनही या चित्रपटाचा फारसा बोलबाला झाला नाही. त्यानंतरच्या ‘अवघाचि संसार’ (१९६०), ‘उमज पडेल तर’ (१९६०), ‘पुत्र व्हावा ऐसा’ (१९६१), ‘चिमण्यांची शाळा’ (१९६२), ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ (१९६२), ‘सूनबाई’ (१९६२), ‘हा माझा मार्ग एकला’ (१९६३), ‘दैवाचा खेळ’ (१९६४), ‘काय हो चमत्कार’ (१९६४), ‘मराठा तितुका मेळवावा’ (१९६४), ‘तुका झालासे कळस’ (१९६४), ‘वैशाख वणवा’ (१९६४), ‘शेरास सव्वाशेर’ (१९६६), ‘सुदर्शन’ (१९६७), ‘मानाचा मुजरा’ (१९६९), ‘काळी बायको’ (१९७०), ‘ती मी नव्हेच’ (१९७०) अशा अनेक चित्रपटात सहनायिकेच्या वा खलनायिकेच्या भूमिकेत चमकल्या.
राजा ठाकूर दिग्दर्शित ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटात, त्यांनी प्रेमभंगामुळे निराश झालेल्या प्रेयसीची भूमिका केली होती. त्यातील ‘जिथे सागरा धरणी मिळते’ हे अप्रतिम गाणे त्यांच्यावरच चित्रित झाले होते. चित्रपट चांगला चालला व त्यांच्या भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक झाले. आपली मुलगी नायिका व्हावी म्हणून वडील दत्तोपंत कांबळे यांनी १९६८ साली ‘जानकी’ हा चित्रपट खास त्यांच्यासाठी निर्माण केला. या चित्रपटात (दोस्ती फेम) सुधीरकुमार त्यांचे नायक असूनही हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही.
‘पारसमणी’ या हिंदी चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा’ या गाण्यावर त्यांनी सादर केलेले नृत्य लोकप्रिय झाले. ‘हसता हुआ नूरानी चेहरा…’ या गाण्याइतकीच ‘हात नका लावू माझ्या साडीला…’ ही लावणीही हिट झाली. ‘मराठा तितुका मिळवावा’ या सिनेमातील हे गाणं. लतादीदीच या सिनेमाच्या निर्मात्या होत्या आणि संगीतकारही. भालजी पेंढारकरांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाला लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिलं होते.
‘पुत्र व्हावा ऐसा’ या सिनेमातील त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘जिथे सागरा धरणी मिळते…’ हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. ‘अखेरचा हा तुला दंडवत…’, ‘साडी दिली शंभर रुपयांची…’, ‘गुलाबी पत्र आलंय मला…’ अशी एका पेक्षा एक मराठी गाणी केली.
नृत्याबरोबरच जीवनकला यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतील भूमिकातून आईवडिलांचा अभिनयाचा वारसा जपला. त्यांनी स्वतंत्रपणे केलेले नृत्याचे कार्यक्रमही गाजले.
‘वैशाख वणवा’, ‘अखेर जमलं’, ‘अवघाची संसार’, ‘काय हो चमत्कार’, ‘संगत जडली तुझी माझी’, ‘शेरास सव्वाशेर’ या मराठी सिनेमांसोबत ‘मि. एक्स इन बॉम्बे’, ‘चायना टाऊन’, ‘उठेगी तुम्हारी नजर’, ‘थिफ ऑफ बगदाद’ या हिंदी आणि तमिळ भाषेतील सिनेमेही केले. ‘जानकी’ आणि ‘दृष्टी जगाची आहे निराळी’ या दोन सिनेमांची त्यांनी निर्मितीही केली.
त्यांना करियरमध्ये बरेच पुरस्कार मिळाले. ‘वैशाख वणवा’, ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमांसाठी, तसंच ‘पुत्र व्हावा ऐसा’ या सिनेमासाठी राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. इसाक मुजावरांच्या ‘रसरंग’चे पुरस्कार मिळाले होते. २०१० साली पी.सावळाराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध पटकथा-संवादलेखक राम केळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हे लग्न सुलोचनादीदींनी जमवले होते. त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की, ‘माझा एक दत्तक पुत्र आहे राम. त्याच्याशी जीवनकलाचं लग्न लावून द्या.’ सुलोचनादीदींनीच नाशिकला जीवनकला आणि राम यांची पहिली भेट घडवून आणली. दुर्दैवाने राम केळकरांचे अकाली निधन झाले. जीवनकला यांनी संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांचा मुलगा हेमंत लेखक व दिग्दर्शक आहे, तर मुलगी मनीषा ही अभिनेत्री आहे.




















