कॅप्टन वासुदेव बेलवलकर हे लष्करी अधिकारी, त्यामुळे त्यांच्या लेखनात मुलुखगिरीची वर्णने व युद्धपटाचे बारीक-सारीक तपशील आहेत. ते फौजेत कॅप्टन म्हणून काम करत होते. 1937 ते 1955 पर्यंत त्यांचे जीवन विमाने, अंतराळी उड्डाण व फौजेतील धसमुसळ्या वातावरणाशी संलग्न राहिले. बेलवलकरांसारख्या पराक्रमाची साथ करणाऱ्या व महाराष्ट्राच्या वैभवाचा अभिमान बाळगणाऱ्या सैनिकाच्या हातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अविस्मरणीय घटनांचा कादंबरीच्या स्वरुपात आविष्कार झाला आहे. मराठ्यांच्या इतिहासातला श्री बेलवलकर यांनी निवडलेला कालखंड व इतिहासाशी प्रामाणिक राहून त्यांचे त्यांनी केलेले सुबक व वेधक चित्रण निशंक प्रशंसनीय आहे. त्यांनी आयुष्याचा महत्त्वाचा पूर्व खंड एका पराक्रम क्षेत्रात घालून उत्तराखंडात कादंबरीस्वरुपात हि जी विलक्षण व विस्मयकारक कामगिरी करून दाखवली आहे ती अनेक अंगांनी
अभिनंदनीय आहे.
कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन २९ जून २००० रोजी झाले.
कॅप्टन वासुदेव बेलवलकर यांच्या प्रकाशित ऐतिहासिक कादंबऱ्या पुढील प्रमाणे –
उधळल्या प्रभा दशदिशा, कळस चढविला मंदिरी, दख्खनचा दिवा हरपला, घटकेत रोविले झेंडे
नवरत्ने हरपली रणांगणी, पेशवाईतील कर्मयोगी, राघोभरारी, राज्य तो छत्रपतींचे, शर्थीने राज्य राखिलं.





















