जन्म. ९ फेब्रुवारी १९२२
इतक्या वर्षांच्या क्रिकेट इतिहासात एका डावात दहा बळी बाद करण्यात फक्त दोन गोलंदाजांना यश आले. त्यातील पहिले होते इंग्लंडचे फिरकी गोलंदाज जिम लेकर आणि भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांना. एका डावात दहा बळी मिळविण्याचा पराक्रम जिम लेकर यांनी सर्वप्रथम केला. ३१ जुलै १९५६ ला ऑस्ट्रेलियाविरुध्द अशेस सिरिजमधे ओल्ड ट्रैफर्डवर जिमने तो विक्रम केला होता. पण महत्वाचे म्हणजे त्या कसोटीत जिमने ऑस्ट्रेलियाच्या २० पैकी १९ विकेटस एकटयानेच घेतल्या. इतर बॉलर्सनी तब्बल १२३ ओव्हर्स टाकल्या, परंतु फक्त एकच गडी ते बाद करु शकले. जिमची फिगर नव्वद धावा व एकोणीस विकेटस. यात पहिल्या डावात ३७ धावांत ९ तर, दुस-या डावात ५३ धावांत सर्वच्या सर्व १० गडी बाद केले होते. हा सामना “लेकर्स मॅच” म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर जिम बर्क हा एकमेव खेळाडू होता ज्याला त्या सामन्यात लेकर बाद करू शकला नव्हता. त्यामुळे जिम बर्क यांचेही नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे लिहिले गेले. त्यांचा बळी मिळवला तो इंग्लंडचे डावखुरे फिरकीपटू ग्रॅहॅम अॅँलथनी रिचर्ड उर्फ ‘टोनी’ लॉक यांनी. हा विक्रम करून जेव्हा जिम घरी आला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला विचारले,”आज तुम्ही खूप मोठं असं काही केलं आहे का? आज तुमच्या अभिनंदनाचे भरपूर फोन येत होते आपल्या घरी. मला नक्की माहीत नाही काय झालंय ते……”
जिम लेकर प्रसिद्ध आहे तो त्याच्या एका डावातील १० विकेट्मुळे; पण इंग्लंडच्या या जिम लेकरची ऑस्ट्रेलियाच्या तडाखेबंद फलंदाज डॉन ब्रैडमैन यांनीही इतर गोलंदाजांना धुतल्याप्रमाणे अनेकदा चांगली धुलाई केली होती हे विशेष. ब्रैडमैन समोर कोणीच टिकायचा नाही मग तो जिम लेकर असो की आणखी कोणी. २० जून १९५८ रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने न्यूझीलंडला ४७ धावांत गुंडाळले. किवींचा या मैदानावरील हा नीचांक ठरला. जिम लेकर आणि टोनी लॉकने मिळून नऊ विकेट्स घेत पाहुण्यांना पन्नाशीही गाठू दिली नाही. १२ तासांच्या आत इंग्लंडने ही कसोटी जिंकली. तसेच २८ ऑगस्ट १९५६ रोजी ओव्हलमधील पाचवी आणि अंतिम कसोटी अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले तरी इंग्लंडने (दोन-एक) अॅशेस राखल्या. यजमानांच्या विजयात जिम लेकरचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. त्याने पाच कसोटीत घेतलेल्या ४६ विकेट्स इंग्लंडतर्फे मालिकेत घेतलेल्या सर्वाधिक ठरल्या.
जिम लेकरवरून आणखी एका महान पण दुर्लक्षित गोलंदाजाची यावेळी आवर्जून आठवण काढवीशी वाटते तो म्हणजे नरेंद्र हिरवाणी. १५ जानेवारी १९८८ रोजी चेन्नई येथे झालेल्या कसोटीत हिरवाणीच्या ऐतिहासिक गोलंदाजीमुळे भारताला बलाढय़ वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवता आली. ही कसोटी म्हणजे हिरवाणीची पहिलीच कसोटी होती. हिरवाणीने पहिल्या डावात ६१ धावांमध्ये आठ विकेट घेतल्या होत्या. यात साक्षात व्हिव्हियन रिचर्ड्सला त्रिफळाचीत करण्याचा पराक्रमही त्याने केला होता. पण दुस-या डावात या दिवशी त्याने ७५ धावांमध्येच पुन्हा एकदा आठ विकेट घेतल्या आणि चौथ्या दिवशीच सामना संपवला. पदार्पणात १६ बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बॉब मेसीनेही इंग्लंडविरुद्ध १९७२ मध्ये केला, पण त्याच्यापेक्षा एक धाव कमी दिल्यामुळे हिरवाणीने नवा विक्रम नोंदवला. कसोटी इतिहासात केवळ दोनदाच हिरवाणीपेक्षा एखाद्या गोलंदाजाने अधिक चांगली कामगिरी करून दाखवली. इंग्लंडच्या जिम लेकरने १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० धावांत १९ बळी घेतले. त्याच्या काही वर्षे आधी इंग्लंडच्याच सिडनी बार्न्स ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच १५९ धावांत १७ बळी घेतले होते. ‘हिरवाणी स्पेशल’ सामन्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दुस-या डावात यष्टिरक्षक किरण मोरेने पाच फलंदाजांना आणि संपूर्ण सामन्यात सहा फलंदाजांना यष्टिचीत केले. जो आजही एक विक्रम आहे. जिम लेकरबद्दल आणखी एक विशेष स्मरणीय खेळी आहे ती म्हणजे फलंदाज म्हणूनसुद्धा…. १९४८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीत इंग्लंडची ८ बाद ७४ अशी अवस्था होती म्हणजे अगदीच अब्रू जायची वेळ होती पण या जिम लेकरने इंग्लंडचा डाव थोडा फार सावरत ६३ धावा करून इंग्लंडचा धावफलक १६५ पर्यन्त नेला.आठव्या क्रमांकावर येऊन खेळलेल्या लेकरच्या याच ६३ धावा इंग्लिश डावातील सर्वाधिक धावा होत्या.
जिम लेकरने १९५ १मध्ये ‘स्पिनिंग राऊंड दि वर्ल्ड’हे आत्मचरित्र लिहिले. क्रिकेटपटूने लिहिलेले हे पहिले आत्मचरित्र. त्यानंतर १९६०मध्ये लेकर यांनीच ‘ओव्हर टू मी’ हे दुसरे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले, पण या आत्मचरित्रामध्ये असलेली भाषा बऱ्याच जणांना आवडली नाही आणि त्यामुळे या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही. एका डावात दहा बळी मिळवण्याचा विक्रम भारताच्या अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांच्या नावावर आहे. भारताच्या अनिल कुंबळे याने या विक्रमाशी बरोबरी केली असली तरी एका कसोटीत १९ बळी घेण्याचा विक्रम सहज मोडला जाणारा नाही. जिम लेकरचे २३ एप्रिल १९८६ रोजी निधन झाले.