जन्म. २३ एप्रिल १९२६
भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित होत्या. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला. अन्नापूर्णा देवी या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन हे शास्त्रीय संगीतातील महारथी होते. अन्नपूर्णा देवींनी आपले बंधू उस्ताद अली अकबर खान यांच्यासमवेत आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्राप्त केले. १९३८ साली रवी शंकर वयाच्या अठराव्या वर्षी अल्लाउद्दीन यांच्याकडे मैहरला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आले. अल्लाउद्दीन यांनी अन्नपूर्णा देवींना प्रथम ध्रूपद आणि सितार शिकवलं. पण नंतर सूरबहार वादनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. सूरबहार आणि सितार यांच्यात साम्य असलं तरी, ते सितारपेक्षा अधिक जड आणि वाजवण्यास अधिक अवघड समजलं जातं. अन्नापूर्णा देवी सूरबहार उत्तम वाजवत असत. अन्नापूर्णा देवी आणि पंडित रवीशंकर यांचा विवाह व्हावा असं उदय शंकर यांचे मत होते. उदय शंकर हे रवी शंकर यांचे वडिल बंधू होते. देशातील कलेच्या क्षेत्रातील दोन दिग्गज कुटुंबं विवाहामुळे एकत्र येतील, ही उदय शंकर यांची कल्पना होती. उदय शंकर यांनी अल्लाउद्दीन यांच्याकडे विवाहासाठी परवानगी मागितली. अल्लाउद्दीन हे प्रथमत: या विवाहाला परवानगी देण्यास तयार नव्हते, पण नंतर त्यांनी विवाहास होकार दिला. अन्नपूर्णा देवी आणि रवीशंकर यांचा विवाह हिंदू पद्धतीने १९४१ साली झाला आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना पूत्ररत्न झाले. शूभेंद्र शंकर असे त्याचे नाव. पण शुभेंद्र शंकर यांचा १९९२ साली अमेरिकेतच अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी शुभेंद्र शंकर यांची योग्य ती काळजी घेतली नाही आणि एका धर्मादाय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पंडितजींनी शुंभेंद्रकडे दुर्लक्ष केलं आणि त्यासाठी आपला दुसरा विवाह झाला असल्यानं जबाबदारी फेटाळली. याबाबत बोलताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या कि, याचा अर्थ पंडितजी शुंभकरला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत नव्हते. पण अल्लाउद्दीन यांच्याप्रती मात्र पंडितजींनी कर्तव्यात कोणतीही कसर ठेवली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्नापूर्णा देवी यांनी आपला शेवटचा कार्यक्रम १९५६ साली सादर केला. त्यानंतर पंडितजी फक्त एकदाच १९८० साली अन्नपूर्णा देवींना भेटायला आले. अन्नपूर्णा देवींनी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शिष्यांना कला शिकवली आहे. त्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित नित्यानंद हळदीपूर, उस्ताद आशिष खान, पंडित बसंत काब्रा, पंडित प्रदीप बारोट आणि पंडित सुरेश व्यास या सरोद वादकांचा समावेश आहे. उस्ताद अल्लाउद्दीन यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनाही अन्नपूर्णा देवींचा आधार होता. त्यात पंडित निखील बॅनर्जी आणि उस्ताद बहाद्दूर खान यांचा समावेश आहे. अन्नपूर्णा देवींनी मैफिलींना राम राम केल्यानंतरही अनेकांनी त्यांना त्यासंदर्भात विनंती केली. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींसह देश आणि परदेशातल्या अनेक नामांकित व्यक्तीमत्वांनी त्यांना वादन चालू करण्याबद्दल आग्रह केला होता पण अन्नपूर्णा देवींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अन्नपूर्णा देवींना १९९७ साली पद्मभूषण, १९९९ साली देशिकोत्तम आणि २००४ साली संगीत-नाटक अकादमीची फेलोशीप मिळाले. हे कोणतेही पुरस्कार स्वीकारण्यास त्या स्वत: गेल्या नाहीत. उस्ताद अली अकबर खान एकदा म्हणाले होते की, रवी शंकर, पन्नालाल घोष आणि मी एका पारड्यात आणि अन्नपूर्णा देवी दुसऱ्या पारड्यात ठेवल्या तरीही त्यांची बाजू वरचढ ठरेल हे अगदी यथार्थ असं वर्णन आहे. मात्र नुकतच त्यांनी आपले एकांतवासाचे आजवर बाळगलेलं मौन सोडलं आहे. पंडित रवी शंकर यांची पत्नी म्हणून ओळख असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पंडित रवी शंकर यांच्या बरोबरचा विवाह टिकवण्यासाठीच आपण संगीताला तिलांजली दिली. आम्ही दोघे एकत्र सितार वादन सादर केल्यानंतर लोकं मला अधिक दाद देत असत. मात्र हे रवी शंकर यांना आवडत नसे असं त्यांनी सांगितलं. रसिक माझ्या वादनाला देत असलेल्या प्रतिसादामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. पंडित रवी शंकर यांनी मला मैफिलीत सादरीकरण करु नये असं जरी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी मला मिळणारी दाद यामुळे ते आनंदी नव्हते. मला व्यवसायिक यश किंवा विवाहातील सौख्य यात निवड करण्याची वेळ आली, तेंव्हा मी विवाह सौख्याला प्राधान्य दिलं. मला नाव आणि लौकिक यापेक्षा लग्न टिकवणं अधिक महत्वाचं वाटलं. पण दुर्दैवाने एवढा त्याग करुनही हा विवाह टिकू शकला नाही. मी सर्वतोपरी प्रयत्न करुन पाहिले, पण मला यश आलं नाही. मला माझे वडिल उस्ताद अलाऊद्दिन खान यांना दुखावयचे नव्हते. उस्तादजी हे पापभिरु व्यक्तिमत्व होते. उस्तादजींना आपल्या मुलीचा विवाह मोडला हे आवडलं नाही. रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर १९८२ साली अन्नपूर्णा देवींनी आपले शिष्य ऋषीकूमार पंड्या यांच्याशी विवाह केला. अन्नपूर्णा देवी यांचे १३ ऑक्टोबर २०१८ रोजी निधन झाले.