जन्म: २३ एप्रिल १९१३ रत्नागिरी येथे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, राजर्षी शाहू या महापुरुषांची अतिशय समर्पक चरित्रे लिहून आधुनिक चरित्रलेखनाचा उच्च कोटीचा मानदंड प्रस्थापित करणारे सव्यसाची लेखक म्हणून धनंजय कीर यांचा दबदबा आजही कायम आहे.
धनंजय कीर यांचे खरे नाव अनंत विठ्ठल कीर होते, हे कीरांचे चरित्र ज्यांनी वाचले आहे त्यांनाच माहीत होते. धनंजय कीर हे नाव कसे घेतले गेले, याचा किस्सा रोचक आहे.
सावरकरांच्या सेवेतून बाहेर पडून भिडे गुरुजींनी ‘फ्री हिंदुस्थान’ नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. या इंग्रजी साप्ताहिकाची प्रूफे वाचण्याचे काम कीर करत असत. असामान्य प्रतिभेच्या कीरांनी या साप्ताहिकात लेखन करावे, अशी भिडे गुरुजींनी खूप गळ घातली आणि जुलै १९४५मधील एका अंकातल्या ‘पेन पिक्चर्स’ या सदरात न. चिं. केळकरांवर त्यांनी एक लेख लिहिला. हा लेख गाजला. त्यानंतर कीर या नियतकालिकातून शब्दचित्रे रेखाटू लागले. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, डॉ. मुंजे यांच्यावरील लेखांची खूपच वाहवा झाली. कीर प्रथमपासूनच सावरकरवादी होते. त्यामुळे जोआकिम अल्वा यांच्या ‘फ्रॉम डोव्हर टू दादर’ या सावरकरांवरील बोच-या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया म्हणून एक लेख लिहिला होता. त्याचे नाव होते ‘लाइफ फ्रॉम प्रिटोरिया टू पाकिस्तान.’ त्यानंतर भिडे गुरुजींनीच ‘मि. धनंजय कीर : द बायोग्राफर’ या शीर्षकाचा एक परिचयपर लेख या नियतकालिकात लिहिला आणि धनंजय कीर हे नाव चरित्रलेखक म्हणून प्रस्थापित झाले. मुंबई महानगरपालिकेत इंग्रज सरकारची नोकरी करताना या स्वातंत्र्यलढयातील महापुरुषांची शब्दचित्रे रेखाटणे म्हणजे मोठीच जोखीम होती. त्यामुळे कीरांनी सुरुवातीला केवळ ‘धनंजय’ हे नाव घेतले होते. हे नाव भिडे गुरुजींनीच सुचवलेले होते. परंतु याच नावाने लेखन करणा-या न्यायमूर्ती वसंत शांताराम देसाई यांनी या नावाला आक्षेप घेतला. तेव्हापासून धनंजयचे धनंजय कीर झाले.
महापालिकेतील नोकरी कीरांनी इमानेइतबारे केली. आíथकदृष्टया स्थिर राहण्यासाठी ती आवश्यक होती. मात्र पालिकेतल्या ब-याच लोकांना चरित्रकार धनंजय कीर आणि आपल्या कार्यालयातले अनंत विठ्ठल कीर हे एकच आहेत, हे माहीत नव्हते. स्वातंत्र्यपूर्व काळात पालिकेच्या नोकरीतच अ. का. प्रियोळकर या सहकारी लेखकाचा त्यांच्यावर चांगला प्रभाव पडला. प्रियोळकर गांधीवादी होते आणि कीर सावरकरवादी. त्यांच्यात खडाजंगी होत असे. कीरांना पालिकेत नोकरी मिळवून देणारे श्रीपाद दत्तात्रय तेंडुलकर हे या वादांमध्ये न्यायमूर्तीची भूमिका बजावत असत. पालिकेच्या नोकरीने कीरांना केवळ स्थैर्यच दिले असे नाही तर त्यांच्या व्यासंगासाठी मोठी पार्श्वभूमीही दिली. अनेक विद्वान मित्रमंडळी त्यांना या काळात भेटली. त्यातूनच त्यांच्या कठोर परिश्रमांना सुरुवात झाली.
रत्नागिरीतल्या शिक्षणात पटवर्धन आणि मांद्रेकर मास्तरांनी इंग्रजीचा चांगला संस्कार त्यांच्यावर केला होता. मात्र इंग्रजी लिहिण्यासाठी योग्य परिश्रमांची आवश्यकता होती. मुंबईत स्थैर्य मिळाल्यावर त्यांचे लक्ष सर्वप्रथम दादरच्या ‘फ्री रीडिंग रूम’वर खिळले. आज ‘काशिनाथ धुरू हॉल’ म्हणून ओळखल्या जाणा-या या संस्थेतील ग्रंथ त्यांनी त्या काळात अधाशासारखे वाचून काढले. या काळात आसपासचे लोक त्यांना ‘वेडा जॉन्सन’ म्हणून संबोधित असत.
सावरकरांवरील प्रेमापोटी त्यांनी जरी सुरुवातीला १९४३मध्ये हार्बजर आणि इतर नियतकालिकांमधील इंग्रजी लेख लिहिले तरी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी स्वत:ची चरित्रलेखनाची आधुनिक शैली विकसित केली. त्यात त्या व्यक्तीच्या प्रेमापेक्षाही त्याच्या आयुष्याचे काटेकोर विवेचन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यासाठी ते त्या व्यक्तीशी निगडित कागदपत्रे व पुस्तकांचा प्रचंड अभ्यास करायचे. ‘एका व्यक्तीचे चरित्र म्हणजे त्याआधी सुमारे ७०० ते ८०० पुस्तकांचा अभ्यास’ असे त्यांनीच रवींद्र पिंगे यांनी त्यांच्या घेतलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. गांधीजींच्या चरित्रासाठी त्यांनी ४० हजार पानांचा मजकूर डोळ्यांखालून घातला होता. चरित्रे लिहिण्यासाठी त्यांनी चरित्रलेखनाचा जो अभ्यास केला तोही अचंबित करणारा आहे. उत्तम चरित्रलेखक कसा असावा, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इंग्रजी साहित्यातील सर्व पुस्तके पालथी घातली. त्यामुळेच त्यांनी ज्यांची-ज्यांची चरित्रे लिहिली त्या थोर महापुरुषांच्या चरित्रलेखनात अभिनिवेश मात्र अजिबात डोकावला नाही. प्रत्येक मुद्दयाचा ते शास्त्रीय पद्धतीने पुरावे शोधून मगच चरित्रात समावेश करत असत. त्यामुळेच सावरकरांनी स्वत:चे चरित्र लिहिले आणि मग ते धनजंय कीरांच्या नावे पुस्तकरूपाने करून घेतले, असा जो आरोप झाला तो या काटेकोर शास्त्रीय पद्धतीमुळेच. कीरांनी ज्यांची चरित्रे लिहिली त्यांच्यावर आधीही लिहिले गेले होते. कीरांची चरित्रे ही स्तुतिसुमनांचा शब्दवर्षाव या पद्धतीची नव्हती. तो एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून अधिक स्वीकारला गेला किंवा त्यांनी पोवाडे रचण्याच्या मानसिकतेतूनही चरित्रे लिहिली नाहीत. व्यक्तिस्तोम बाजूला सारून चरित्रे लिहिण्याची अवघड किमया त्यांना साधली होती. काळजीपूर्वक छाननी केलेल्या पुराव्यांच्या आधारे अतिशय लयबद्ध पद्धतीने चरित्रग्रंथ कीरांनी लिहिले. कीरांच्या चरित्रांमध्ये त्यांच्या स्वत:च्या बुद्धिमत्तेची झलक दिसते. एखाद्या लोकोत्तर आयुष्याचा प्रचंड पसारा ग्रंथबद्ध करण्यासाठी लागणारी सम्यक दृष्टी आणि कुशाग्र बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती. चरित्रलेखन हे जीवनाचे ध्येय ठरवल्यावर त्यासाठी आवश्यक त्या व्यासंगाची जोपासना त्यांनी आयुष्यभर केली. ख-या ज्ञानोपासकाच्या भूमिकेत ते कायम राहिले. माहीमच्या त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात पुस्तकांचे ढीगच्या ढीग होते. कपाटातली जागा अपुरी पडली तेव्हा घराच्या तुळय़ांना पुस्तकांची गाठोडी लटकू लागली. सतत वाचून त्यांच्या चष्म्याची जाडी वाढत गेली. चरित्र लेखनाच्या निमित्ताने त्यांचा प्रभावशाली मित्रपरिवार वाढला होता. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक लेखक, संपादक, बुद्धिवादी, मंत्रिगण त्यांच्या संपर्कात आले. पण त्याचा उन्माद कधी त्यांच्या आयुष्यात डोकावला नाही. ते सतत अभ्यासकच राहिले. त्यांच्या आर्थिक परिस्थितीतही त्यामुळे फरक पडला नाही. अगदी नोकरीतही त्यांना फारशी बढती मिळाली नाही. अनेक प्रभावशाली व्यक्तींनी स्वत:चे चरित्र कीरांनी लिहावे, म्हणून गळ घातली होती. पण कीर कुणालाच बधले नाहीत. धनंजय कीरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी कीरांच्या लिहिलेल्या चरित्रातून काही वैयक्तिक माहिती मिळते. धनंजय कीरांचा ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक या विषयाचा अभ्यास होता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली तीही त्यांच्या हाताचे ठसे घेण्याच्या निमित्ताने, असेही त्यांनी नमूद केले आहे. आंबेडकरांचे काही भविष्यही त्यांनी वर्तवले होते. पण त्याचवेळी धनंजय कीर हे नास्तिक होते, असेही चरित्रातून समजते. धनंजय कीरांचे सासरे भिकाजी तात्या कनगुटकरांचे असगोलीचे घराणे मातब्बर. त्यांच्या मुंबईतही चाळी होत्या. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. ते इतके श्रीमंत होते की, आपल्या गावाला जाण्यासाठी त्यांनी एकदा चक्क विमान केले होते. गुहागर तालुक्यातल्या या खेडेगावाच्या सागर तटावर कुठलीही धावपट्टी नसताना वाळूवर हे विमान उतरले होते. हे विमान चालवणारा कुणी कुशल पारशी पायलट होता. या वाळूवरून त्यांचे विमान पुन्हा हवेतही झेपावले. आपल्या पत्नीच्या माहेरची ही पार्श्वभूमी असतानाही धनंजय कीरांनी आपला वसा कधी सोडला नाही, हे महत्त्वाचे. ते माहीमच्या छोटया घरात राहून सरस्वतीची सेवा करत राहिले.
कीर हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिस्तप्रिय शाळा तपासनीस म्हणून ओळखले जात असत. त्यांनी दादर परिसरात त्यांच्या नावे मुलींसाठी एक रात्रशाळाही सुरू केली होती. ती अजूनही सुरू आहे. मात्र कीरांचा प्रथमपासून आग्रह होता की, ज्या दिवशी संस्थेत भ्रष्टाचार शिरेल त्या दिवशी संस्था बंद करावी. कीर हयात असतानाच त्यांच्या संस्थेला भ्रष्टाचाराने पोखरले होते. त्यांच्या संस्थेतील एक शिक्षिका नलिनी शहाणे यांनी कीरांना संस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. त्यानंतर कीरांनी लगेच कारवाई करून कार्यकारिणी बदलून टाकली आणि संस्थेच्या कारभाराची घडी पूर्ववत केली होती. आज नलिनी शहाणे कीरांच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा संस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. शहाणे यांचे म्हणणे आहे की, आज संस्थेच्या या रात्रशाळेत मुलीच नाहीत. खोटी पटसंख्या दाखवून अनुदान घेतले जात आहे. अशा कारणांसाठी आपल्या नावाची संस्था सुरू ठेवणे, कीरांना कधीही आवडले नसते. धनंजय कीर हे अतिशय सज्जन आणि प्रामाणिक गृहस्थ होते, हे त्यांच्या संपर्कात आलेले अनेक लोक आजही सांगत असतात. कीरांनी ज्या महापुरुषांच्या चरित्रांना शब्दबद्ध केले त्या सर्वाचे अलौकिक गुण आपल्यातही उतरवण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले होते. एका अद्वितीय चरित्रकाराची सारी लक्षणे त्यांच्या स्वभावातही होती. धनंजय कीर यांचे यांचे १२ मे १९८४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे धनंजय कीर यांना आदरांजली.