संपावर असलेले कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर परतू लागले आहेत. गुरुवारी ४ हजार ८८८ कर्मचारी रूजू झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे ८२ हजार १०८ कर्मचाऱ्यांपैकी ७३ हजार ९७० कर्मचारी कामावर हजर असून आणखी ८ हजार १३८ कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा एसटी महामंडळाला आहे. रुजू होण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ९ हजार ७०० पेक्षा जास्त बसगाडय़ा धावत असून त्यांच्या दररोज २८ हजापर्यंत फेऱ्या होऊ लागल्या आहेत.
यामध्ये येत्या काही दिवसांत वाढ होईल. संपकरी कर्मचारी पुन्हा परतू लागल्याने आणि एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामिण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०२२ ला झालेल्या सुनावणीवेळी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी २२ एप्रिलपर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा दिला होता.
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विविध विभागातील कर्मचारी रुजू होत आहेत. सध्या ७३ हजार ९७० कर्मचारी कर्तव्यावर असून त्यात २६ हजार ३७३ चालक आणि २१ हजार ४६८ वाहकांचा समावेश आहे.
अद्याप ८ हजार १३८ कर्मचारी संपावर आहेत. यामध्ये ३ हजार ११२ चालक आणि ३ हजार ३५८ वाहक आहेत तर २०९ प्रशासकीय आणि १ हजार ४५९ कार्यशाळा कर्मचारी असल्याची माहिती महामंडळाने दिली.