अलिबाग
सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे-पालकमंत्री अदिती तटकरे
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून भव्य आरोग्य मेळावा,मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पालकमंत्री अदिती तटकरे यांनी अलिबाग येथे सर्व रोग निदान आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ. सुधाकर मोरे,अतिरिक्त शल्यचिकित्सक गवई,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की,प्रत्येक तालुक्यात या शिबिराचे आयोजन होत असताना याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावे.हा मेळावा काही विशिष्ट आजारावर नसून सर्व रोगासाठी आहे.
हा आरोग्य मेळावा सर्व रोगासाठी असल्याने त्याचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा अशी प्रामाणिक इच्छा ही माझ्यासाहित आरोग्य विभागाची आहेत. अनेक नवीन उपक्रम राबवित असताना,खऱ्या अर्थाने शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना याचा प्रसार करणे गरजेचे आहे.
अनेक वेळा नागरीकांना आरोग्य विषयक सुविधा ह्या शासकीय रुग्णालयात मिळतात याची माहिती नसल्याने ते खासगी रुग्णालयात जात असतात. त्यांना त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार कोणत्या प्रकारचे लाभ मिळू शकतील यांची माहितीसुद्धा नसते.
ज्योतीबा फुले आरोग्य योजनेतून अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.या योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयात दोन टक्के खाटा उपलब्ध आहेत आता ती संख्या चार टक्के इतकी नेण्यात येणार आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना त्याचाही लाभ मिळणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या केंद्राअंतर्गत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध आहे मात्र याची बहुतांश नागरिकांना माहीत नसल्याने ते एकतर खासगी रुग्णालयात जातात नाहीतर जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन उपचारासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी होत आहे याचा प्रसार होण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.