जन्म.१९४२ मुंबई येथे.
नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नांदलस्कर कुटुंब मूळचे खारेपाटण तालुक्यातील शेजवली गावचे. त्यांचा जन्म मुंबईचाच. किशोर नांदलस्कर यांचे बालपण मुंबईतील लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर या भागात गेलं. किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. जुन्या काळात त्यांनी अनेक नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’गिरणीत नोकरी करू लागले. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटके बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे लहानपणापासूनच नांदलस्कर यांना अभिनयाचं वेड लागलं होतं. एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचं आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नोकरी करत नाटकात काम करत होते. किशोर यांनी सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘हळद रुसली कुंकू हसली’, ‘शेजारी शेजारी’, ‘सारे सज्जन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘वन रुम किचन’, ‘भ्रमाचा भोपळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं होतं. यातीलही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्कर यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी आपल्या खास अंदाजात सादर केल्या होत्या. किशोर नांदलस्कर यांचे ‘नाना करते प्यार’ हे व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होते. किशोर नांदलस्कर यांचे २० एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.