जन्म. १६ सप्टेंबर १९१३
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता.
या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली.