कोळी समाजाने अनेकदा निवेदने व रीतसर भेट मागून सुद्धा टाळाटाळ करून अदानी ग्रुप मधील कोणताही अधिकारी कोळी लोकांच्या समस्या ऐकावयास तयार नाही. मिटींगला बोलावतात व प्रत्यक्ष अधिकारी वर्ग अनुपस्थित राहतात. अदानी यांच्या पोर्टला केंद्रशासनाचा वरदहस्त असल्याने आमदार, खासदार सुद्धा आम्हाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड विभागीय मच्छिमार संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी मुरूड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला .

यावेळी त्यांच्यासमवेत नाखवा मंडळाचे अध्यक्ष नारायण चव्हाण, दिघी येथील एकविरा मच्छिमार संघाचे चेरमन लक्ष्मण मेंदडकर, जय भवानी मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र गार्डी, लहान नाखवा मंडळाचे सचिव रमेश रामचंद्र बाणकोटकर, कृष्णा चव्हाण, रघुनाथ बाणकोटकर, चंद्रकांत सरपाटील, महेशवरी सहकारी संस्थेचे चेरमन जगनाथ वाघरे, संदीप डाकी, जाया मकु, किशोर केंडू, ललित आगलावे, लक्ष्मण नागूठकर, संजय मालीम, राजेंद्र गीते, काशिनाथ गर्जा, नरेश आगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दिघी पोर्टने सुरुवातीच्या काळात १४ गाव संघर्ष समितीशी करार केला होता. परंतु, तद्नंतर दिघी पोर्टचा ताबा अदानी ग्रुपकडे आला आहे. कोळी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आमच्या ताकदीवर आंदोलन करावे लागणार असून येत्या दोन दिवसात कंपनीने आमच्याकडे लक्ष्य न दिल्यास अदानी ग्रुपच्या विरोधात सागरी आंदोलन छेडले जाईल अशाही इशारा यावेळी देण्यात आला
सध्या अदानी पोर्टकडून खोल समुद्रात ड्रेनेज केले जात असल्यामुळे चिखल काढला जात आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असणारी मासळी खूप दूर निघून गेली आहे. भविष्यात या भागातील मासळीचा व्यवसाय टिकेल किंवा नाही अशी प्रस्थती निर्माण झाली आहे. होड्यांचे ऑइल समुद्र किनारी येऊन किनारे विद्रूप होत आहेत.मागील दोन वर्षात मच्छिमारांचे ५० कोटी रुपयांचे नुकसान या पोर्टमुळे झाले आहे. ज्यावेळी ड्रेनेज केले जाते त्यावेळी आम्हा मच्छिमारांना शासनाकडून भरपाई दिली जाते. परंतु अदानी ग्रुपकडून कोळी समाजाला कोणतीही मदत मिळत नाही. या कंपनीकडून आम्हाला प्रत्येक बोटीमागे वार्षिक १० लाख रुपयांची मदत भरपाई म्हणून दिली जावी अशी प्रमुख मागणी सरपाटील यांनी केली आहे. प्रकाश सरपाटील यांनी सागरी आंदोलाबाबत सांगितले कि, आमचे सर्व मच्छिमार खोल समुद्रात जाऊन अदानी कंपनीचा येणारा बोटीद्वारे माल अडवला जाणार आहे. कोणतीही बोट किनाऱ्याला लागू देणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत हे सागरी आंदोलन सुरु राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

नाखवा मंडळाचे अध्यक्ष नारायण चव्हाण यांनी सांगितले कि, कंपनीने जहाजांना येण्यासाठी जे चॅनेल उभारले आहेत ते काढून आता अतिरिक्त जागा घेऊन मोठ्या प्रमाणात भाग खोल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे जर समुद्र तळाशी असणाऱ्या विषारी वायूचा स्फोट झाला तर मोठ्या प्रमाणात मासळी मरणार आहे. त्यामुळे किनारीवरील असंख्य मच्छिमारांचे मोठे नुकसान होणार आहे. यावेळी दिघी येथील एकविरा मच्छिमार संघाचे चेरमन लक्ष्मण मेंदडकर यांनी सांगितले कि, या पोर्टमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. दीड महिन्यापासून मासळी मिळत नाही. मोठ मोठ्या जहाजावरील निरमजल समुद्राच्या पाण्यात सोडल्यामुळे मासळीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कोळसा उतरवल्यामुळे आजूबाजूच्या गावाला कॅन्सर रोगाचा धोका निर्माण झाल्याचे सांगितले.

अदानी ग्रुपने कोळी समाजाला भरपाई द्यावी प्रशासन आम्हाला सहकार्य करीत नाही. चॅनेलमुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पर्यावरण खात्याची कोणतीही परवानगी नाही. संतप्त मच्छिमार कंपनीला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. मागण्या मंजूर होईपर्यंत हे आंदोलन करणार असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा यावेळी मच्छिमारांकडून देण्यात आला आहे.