जन्म: २० एप्रिल १९५०
प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव ह्यांचे जावई असलेले नारा उर्फ एन. चंद्रबाबू नायडू १९९५ साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर आले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत एन. चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजधानी हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. सध्या हैदराबाद देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू ह्यांच्याकडे जाते. त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी हैदराबादला भेट दिली. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली. हैदराबाद शहरावर व माहिती तंत्रज्ञान उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषत: शेती उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्कारून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले. सुमारे १० वर्षे राजकारणामध्ये निष्क्रिय राहिल्यानंतर २०१४ साली आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देशम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या. ८ जून २०१४ रोजी नायडू पुन्हा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर आले. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ देणाऱ्या तेलुगू देशमला १६ लोकसभा जागांवर विजय मिळाला. २०१८ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने भाजपचं नेतृत्त्व असलेल्या एनडीएला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत होता. आंध्रप्रदेश पासून तेलंगणा वेगळे झाल्यानंतर प्रथमच आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून एन. चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली होती.