जन्म. १२ जून १९४६
जेष्ठ गायक श्रीपाद पराडकर यांचे वडील पं. राजारामबुवा पराडकर व आई संगीत शिक्षिका यामुळे लहानपणापासूनच अनेक राग, बंदिशी सतत कानावर पडत असत व त्यातूनच संगीत शिकत गेले.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच पं. सी. आर. व्यास व वडील पं. राजारामबुवा पराडकर यांच्याकडून संगीत शिक्षण सुरु झाले. पुढे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या महान गायकांकडूनही मार्गदर्शन त्यांना मिळालं. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी चित्रपट महर्षी कै. व्ही. शांताराम यांच्या समोर त्यांच्याच अमर भुपाळी चित्रपटातील ‘घनश्याम सुंदरा’ गाऊन मी पुरस्कार मिळवला होता. त्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळवले. पुढे स्टेट बँकेत नोकरी लागल्यावर सलग सहा वर्षं अखिल भारतीय स्तरावर गाण्याच्या स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळवले. १९६५ ते ७० मध्ये ‘कल के कलाकार’ या महोत्सवात त्यांना सुरमणी किताब मिळाला होता. हरिदास संगीत संमेलनात त्यांनी आपली सेवा सादर केली आहे. १९७५ मध्ये ‘संगीत देव माणूस’ नंतर विजया मेहता यांच्या हिंदी ‘शांकुतल’मध्ये व दशावतारी नाटकात गाऊन राज्य नाट्य स्पर्धेत या पार्श्व संगीताबद्दल आणि अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले. पुढे वारकरी संप्रदायाचे बाबा महाराज सातारकर यांच्या सोबत त्यांनी ध्वनीमुद्रीका केली. पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या एकसष्टी निमित्त झालेल्या मैफिलीत त्यांनी नटभैरव व मुंद्रांमधील छायानट, मारवा, बिहाग इ. राग सादर केले होते. श्रीपाद पराडकर यांचे चिरंजीव ललित हे उत्कृष्ट तबलावादक असून श्रीपाद पराडकर यांच्या कन्या दीपा पराडकर साठे यांनी पं.अजित कडकडे यांच्याकडे संगीत शिक्षण घेऊन त्याही उत्कृष्ट गायिका म्हणून ज्ञात झाल्या आहेत. त्यांनी एम.ए. (म्युझिक) केलं आहे.