खोपोली । खालापुरातील घोडीवली-अंजरून गाव रस्ता खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवाशांना जिकरीचे बनले आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्याची अक्षरशः प्रश्चाळण झाल्याने संबंधित हा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागामधील काही रस्त्यांची अवस्था पाहता अत्यंत बिकट बनल्याने प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हे समजत नाही. मात्र याचा नाहक त्रास प्रवासीवर्गासहवाहनचालकांना करावा लागत आहे. खड्यांमुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाणही वाढू लागल्याने याचा फटका सर्वांना आर्थिक व शारीरिक दुखापतीच्या स्वरूपात सोसावा लागत असल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून घोडीवली अंजरुन गाव या मार्गाची खड्ड्यामुळे चाळण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणे सर्वांनाचकष्टमय बनल्याने सर्वामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या मार्गावरील खड्ड्यातून पुढील मार्ग शोधणे सर्वाना जिकरीचे बनू लागल्याने संबंधित प्रशासनानाविरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांचे गांभीर्य लक्षात घेऊन हा मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा अशी मागणी सध्या परिसरात जोर धरू लागली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडोशाळकरी विद्यार्थी, महिलावर्ग, प्रवासी वर्ग ये-जा करत असतात. पायी चालताना अनेकांचे पाय खड्ड्यात मुरगळणे तसेच खड्ड्यातील मोठमोठाल्या दगडांमुळे गाडी स्लिप होणे असे अपघात घडतात. मात्र याचे सोयरेसुतक कोणालाही राहिलेले नाही. या मार्गावरील पूलही गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेच्या दुष्टचक्रात सापडला आहे. या पुलाचे संरक्षण कठडेही गायब झाल्याने रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना अपघाताची भीती वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होते? पूल सुरक्षित कधी होतो ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे शासनाच्यावतीने कोटावधींचा निधी उपलब्ध करत अनेक रस्ते चकाचक बनवण्यात आले असले तरी घोडीवली अंजरून रस्ता मात्र उपेक्षित राहिल्याचे दिसून येत आहे.





















