खोपोली। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना खोपोली शहरात फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्यावतीने शहरात बंदचे आवाहन करताच खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.

खोपोली बाजारपेठेतून निघालेल्या निषेध रॅलीत पुरोगामी विचाराचे नेते, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बोल तरूणा हल्लाबोल फडणवीस पे हल्लाबोल’ घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या वतीने खोपोली शहरात मंगळवारी, १७ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून खोपोली शहर मुख्य बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली.

या रॅलीत फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचे पदाधिकारी, शेकापक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.सोमजाईवाडी, खालाची खोपोली, मुख्य बाजारपेठेतून जोरदार रॅली काढण्यात आली पुढे दिपक चौकात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यास्मारकासमोर सांगता करण्यात आली.

परभणीत आंबेडकरी विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात असताना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था न राखता आंदोलन कसं चिघलेल असे केल्यामुळे सोमनाथ यांचा बळी गेल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनीनिषेध करीत सांगीतले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना शासनाने पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, काही बांधवांवर लाठी हल्ले होत असतील तर गृहखातं करतंयकाय? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी विचारत संबंधितांची चौकशी करून गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.दलितांचा कोणताही लढा असला कीएकतरी बळी घेणार असा आरोप फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे कैलास गायकवाड यांनी विचार संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सोमनाथ सुर्यवंशीचा बळी घेतल्याचे सांगितले.

संविधानाची विटंबना करणाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली म्हणून संविधान अस्पृश्य आहे का? असा सवाल करीत त्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी केली आहे. समाजकंटक समानतेचा ग्रंथ कधीच स्वीकारणार नसल्याने तरूणांनी आता सावध होण्याची गरज असल्याचे पानसरे यांनी सांगितले. खोपोली शहर बंदसाठी व्यापारी, माजी मार्केट, रिक्षा संघटना यांनी सहकार्य केल्याबद्दल फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचचे रविंद्र रोकडे यांनी आभार मानले.