कर्जत, (वा.) १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रमुख नानासाहेब पेशवे स्मारक समिती कडून नानासाहेब पेशवे यांची २०० वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. ७ आणि ८ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती सोहळ्यात नानासाहेब पेशवे तसेच संपूर्ण पेशवाईचे दर्शन पाहायला मिळणार आहे. दरम्यान, नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक यांच्या जन्मभूमी व्हावे यासाठी स्मारक समिती प्रयत्नरत आहे. १८५७ च्या उठावाचे प्रमुख असलेले दुसरे नानासाहेब पेशवे यांचा मोठा सहभाग होता. त्यांचा २०० वा जन्मशताब्दी महोत्सव देशभर साजरा होत असून त्यांचे मूळ गावी कर्जत जवळील वेणगाव येथे हा सोहळा दोन दिवस चालणार आहे. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मारक समितीच्या वतीने वेणगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष भाई गायकर, सचिव रमेश मुंढे, कोषाध्यक्ष नितीनकांदळगावकर यांच्यासह रायगड समारक मंडळाचे राजेश मोरे आणि नानासाहेब पेशवे यांची द्विशताब्दी जयंती साजरा व्हावी म्हणून पुढाकार असलेले इतिहास प्रेमी मोहन शेटे आदी उपस्थित होते.

रॅली आणि शस्त्रप्रदर्शन

८ डिसेंबर रोजी नानासाहेब यांची २०० वी जयंती केली जाणार यासाठी स्मारक समिती काम करीत आहेत. उत्तर भारतात भव्य स्मारक आणि भव्य पुतळा आहे. त्यांच्या जन्मगावी वेणगाव येथे ७ डिसेंबर रोजी कर्जत शहरात सर्व शाळांचे विद्यार्थी यांची रॅली काढली जाणार आहे. पुण्यातून नानासाहेब पेशवे रथ यात्रा निघणार असून या यात्रेचे स्वागत १५ गावात होणार आहे. तर पुण्यातून शनिवार वाडा आणि किल्ले रायगड येथून पवित्र जल आणले जाणार आहे. त्यासाठी शिवाजी स्मारक मंडळ कार्य करीत आहे. वेणगाव येथे मुख्य सोहळा होणार असून शस्त्र प्रदर्शन, तसेच ३५० वर्षांचा इतिहास यावरील पुस्तक तेथे उपलब्ध होणार आहे. राष्ट्र वीर मंडळ मर्दानी खेळ करणार आहेत.