माथेरान मध्ये पर्यटन वाढीसाठी आणि एकंदरीतच व्यावसायिक दृष्टिकोनातून,शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या, व्यापाऱ्यांना वाहतुकीच्या सोयीसाठी, आबालवृद्धांना सुखकर प्रवासासाठी,अपंग, जेष्ठ पर्यटकांना सुध्दा या स्थळाचा आनंद उपभोगण्यासाठी, रुग्णांची जलदगतीने सोय होण्यासाठी आणि विशेष म्हणजे पर्यटकांना स्वस्तात प्रवासासाठी आगामी काळात ई रिक्षा हेच एक उत्तम माध्यम ठरणार असल्याने इथे ई रिक्षा सुरू व्हावी जेणेकरून आजवर रक्ताचे पाणी करत हातरीक्षा ओढून काबाडकष्ट करणाऱ्या, या श्रमिकांना सुध्दा सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी मागील दहा वर्षांपासून शासन दरबारी अविरतपणे पाठपुरावा करणारे श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदेंच्या अथक प्रयत्नांना यश आले असून या ई रिक्षांची चाचणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बुधवार दि.२७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. हा दिवस खऱ्या अर्थाने माथेरान करांसाठी एक अभूतपूर्व अन ऐतिहासिक घटना ठरणार आहे. याच ई रिक्षांच्या माध्यमातून चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांची चार ते पाच किलोमीटरची पायपीट क्षमणार आहे.त्यामुळेच ह्या ई रिक्षाच्या चाचणी साठी येणाऱ्या शासकीय अधिकारी वर्गाच्या त्याचप्रमाणे सनियंत्रण समितीच्या पदाधिकारी यांच फलकाद्वारे स्वागत करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची आतापासूनच लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. माथेरान करांसाठी हे एक स्वप्नवत सत्य ठरणार आहे आणि अत्यंत आनंदाने या अभूतपूर्व सोहळ्याचे सर्वानी साक्षीदार व्हायला हवे असे माथेरान नगरीच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले आहे.
माथेरान मध्ये ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दि १२ मे २०२२ रोजी
हिरवा कंदील दिलेला आहे.
त्या अनुषंगाने मा महाराष्ट्र शासन, मा माथेरान सनियंत्रण समिती आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषदने,सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता केली असून, त्याचाच एक भाग म्हणुन, आपल्याकडे प्राप्त 06 EOI नुसार सदर ई रिक्षांची प्रत्यक्ष परीक्षण चाचणी, मा सनियंत्रण समिती व जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या सूचनेनुसार आणि निर्देशनुसार दि.२७ जुलै २०२२ रोजी मा.एसडीओ, मा प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्या निरीक्षणाखाली मा.डीवायएसपी कर्जत, मा प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक अधिकारी, मा अधीक्षक, मा.वनक्षेत्रपाल, मा.प्रभारी पोलीस निरीक्षक आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषदचे अधिकारी यांच्या समिती च्या उपस्थितीत होणार असून
मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून सर्व प्रकिया पार पाडली जाणार आहे.
खूप वर्ष पासून प्रलंबित असलेल्या आपल्या प्रश्नाचा अंतिम टप्पा जवळ आलाय.
आणि या मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा क्षण आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रत्यक्षात येणार आहे.आपल्या शहरातील सर्वांच्या इच्छा,आकांक्षामुळे आणि शासनाच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं आहे.
आपण आपल्या या नगरीत पर्यावरण पूरक वाहतुकीच्या या नवीन सदस्यांचे आनंदाने स्वागत करूयात असे मत सुरेखा भणगे
मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी मांडले.





















