जन्म. १३ जुलै १८९२
मा.केसरबाई केरकर या हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत. त्यांच्या मामांना गाण्याची आवड होती आणि केसरबाईंचे गाण्यातील गुण बघता ते त्यांना गावातील पुजाऱ्यांकडे गाणे शिकायला घेऊन जात. पण तिथे फक्त भजने आणि कीर्तने शिकायला मिळतं म्हणून शेवटी ‘खरे’ गाणे शिकायला आठ वर्षांच्या केसरबाईंना त्यांचे मामा उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांकडे कोल्हापूरला घेऊन गेले. पण पुढची १९ वर्षं त्यांच्या गान-तपश्चर्येत बाधाग्रस्तच होती. दर वेळेस कोणी चांगला गुरु लाभला की त्या गुरूस कोणी धनाढ्य आपल्या आश्रयाला दुसऱ्या गावी बोलावून घेई. १९०८ मध्ये केसरबाई मुंबईला रहावयास गेल्या आणि म्हैसूर आणि पाटणा दरबारातील प्रसिद्ध सितारीया बरकतुल्ला ह्यांच्याकडून गाणं शिकू लागल्या.
त्यानंतर एक वर्षभर पंडित भास्करबुवा बखले आणि पंडित रामकृष्णबुवा वझे ह्यांच्याकडून शिकल्या. पण गाण्याच्या तालनीत सारख्या पडणाऱ्या खंडाला कंटाळून केसरबाईंनी उस्ताद अल्लादिया खानसाहेबांकडेच शिकायचा ठाम निश्चय केला. खानसाहेबांनी शिकवण्यास साफ नकार दिला. केसरबाईंचाही हट्ट दांडगा! शेवटी खानसाहेब राजी झाले पण शिकवण्याच्या खूप अटी घातल्यानंतरच! आखिर १९२० साली केसरबाई अल्लादिया खानसाहेबांच्या गंडाबंद शिष्य बनल्या. खानसाहेबांना कळले की ही शिष्या किती प्रामाणिक मेहनत करणारी आहे आणि तिचे गान-कलेवर किती नितांत प्रेम आहे ते! दिवसातील ९-१० तास ते केसरबाईंना शिकवत. त्यांचे शिकवणे खूप शिस्तबद्ध असे. एकच पलटा १०० वेळा ते घोकून घेत ज्यामुळे केसरबाईंचं गाणं सुराला अतिशय पक्क झालं. केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना ‘सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्र सरकारने त्यांना “राज्य गायिका” ह्या किताबाने गौरविले. मा.रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. मा.रवींद्रनाथ टागोरांनी ‘सूरश्री’ किताब बहाल केला. त्या वेळी रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते, “मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की केसरबाईंचं गाणं मला ऐकायला मिळालं. त्यांचं गाणं म्हणजे एक परिपूर्णते कलात्मक साक्षात्कार आहे.
त्यांच्या गाण्यावरून हे सिद्ध होते की गाण्यात केवळ तांत्रिक परिपूर्णता असून चालत नाही. त्यात चमत्कृती आणि आविष्काराचीही तितकीच आवश्यकता आहे आणि हे केवळ एका जन्मजात प्रतिभाशाली कलाकारालाच शक्य आहे.” रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून मा.केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले. संगीत नाटक अकादमीने १९५३ साली ‘प्रमुख आचार्या’ ही सनद त्यांना बहाल केली. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते. गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे.