जन्म.२३ जून १९५९ अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथे.
पॉप आणि फ्यूजन हे पाश्चात्त्य संगीतातील प्रकार भारतीय संगीत तरून पिढीच्या अंदाजाने व्यक्त करणाऱ्या शुभा मुदगल या पहिल्याच लोकप्रिय कलावंत. भारतीय चित्रपट संगीतात हे सारे प्रकार खूप आधीपासूनच रुळले होते आणि लोकप्रियतेच्या शिखरावरही आरूढ झाले होते. अभिजात संगीतातही अनेक शैलींचे एकत्रीकरण करून नवीच शैली स्थापित करणारे कलावंत एक प्रकारे फ्यूजनच करीत होते. मात्र त्यातील अभिजाततेचा दर्जा त्यांनी ढळू दिलेला नव्हता. शुभा मुदगल या पूर्वाश्रमीच्या शुभा गुप्ता होत.अलाहाबादला रामाश्रय झा यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतलेल्या मुदगल यांनी शिक्षणासाठी दिल्लीत गेल्यानंतर विनयचंद्र मौदगल्य यांच्याकडे संगीताचे शिक्षण सुरू ठेवले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर संगीताचा प्रसार हे विनयचंद्रांचेही ध्येय बनले आणि त्यामुळेच त्यांनी दिल्लीत गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. विनयचंद्रांकडून संगीत शिकत असतानाच्याच काळात जागतिक संगीतातील अनेक नवे स्रोत भारतीयांना नव्याने उमगू लागले होते. त्याचे आकर्षण अभिजात संगीतातील कलावंतांना वाटत असले, तरीही परंपरेने त्याचा विचार करणेही त्यांना जडपणाचे वाटत होते. अशा काळी मुदगल यांनी नवे प्रयोग करायचे ठरवले. ‘आली मोरी अंगना’ या त्यांच्या पहिल्याच अल्बमने लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर ‘अब के सावन’ या संग्रहाने तर प्रचंड दाद मिळवली. शुभा मूदगल यांनी इंडी-पॉप अल्बम्स साठी गायलेली ” अब के सावन ऐसे बरसे ” आणि ” सपना देखा है मैने ” ही गाणी खूप गाजली होती. अशी गाणी गत असताना शुभा मुदगल यांनी आपली अभिजात संगीताची कास मात्र सोडली नाही. शुभा मुदगल यांनी मुकुल मुदगल यांच्याशी लग्न केले. शुभा मुदगल यांचे पती मुकुल मुदगल हे विनय चंद्र मुदगल यांचव चिरंजीव होत. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. २००० साली त्यांनी प्रसिद्ध तबलावादक अनीश प्रधान यांच्याशी विवाह केला.
भारत सरकारने २००० मध्ये शुभा मुदगल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच त्यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाला आहे. शुभा मुदगल यांनी संगीतावर आधारित लघुकथांचे ‘लुकिंग फॉर मिस सरगम’ हे पुस्तक लिहिले आहे. ललित लेखनाचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असून, भारतीय संगीतावर एका वेगळ्या बाजूने त्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
शुभा मुदगल या ‘अंडरस्कोर रेकॉर्ड’ संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या ‘अंडरस्कोर रेकॉर्ड’ या संस्थेच्या वतीने या नावाची वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील लहानमोठ्या कलाकाराला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या वेब साईट द्वारे करता येतो. शुभा मुदगल आणि त्यांचे पती तबलावादक अनीश प्रधान यांनी डिसेंबर २०१०ला ही वेबसाईट सुरू केली.