जिल्ह्यात १ ते १५ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रणासाठी पंधरवडा राबविण्यात येणार असून, त्यात अतिसार असलेल्या सर्व बालकांना झिंक व ओआरएसचे नि:शुल्क वाटप केले जाणार आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हाच मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
अतिसार नियंत्रण पंधरवड्यात पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी पालकांचे समुपदेशन व अतिजोखमीची क्षेत्रे, तसेच दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने अशा सर्व ठिकाणी ‘ओआरएस व झिंक कॉर्नर’ स्थापून त्याचे विनामूल्य वाटप होईल.
आशा सेविकांच्या माध्यमातून गृह भेटी देऊन वाटप करण्यात येईल, तसेच ओआरएस तयार करण्याच्या पद्धती, हात धुण्याचे महत्व याबाबत माहितीही दिली जाणार आहे. अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. अतिसाराची लक्षणे धोक्याची चिन्हे तसेच नियमानुसार उपचार पध्दती व आवश्यक वाटल्यास संदर्भ सेवा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
………..
अतिसार लक्षणे
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
…………





















