जन्म. २९ जून १९५७ पुणे येथे.
पं.अतुलकुमार उपाध्ये यांनी आपल्या वयाच्या चौथ्या वर्षांपासून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील बाळकृष्ण. शं. उपाध्ये हे व्हायोलिन वादनातील गुरु. त्यांनी गाणं शिकल्याशिवाय व्हायोलिन हाती घ्यायचे नाही असे सांगितले. त्यामुळे पं.अतुलकुमार उपाध्ये हे अगदी गायक नसले तरी त्यांच्या सुरांचे ज्ञान पक्के आहे. पं. एम. एम. गोपालकृष्णन, येहूदी मेन्युहिन आणि श्रीधर पार्सेकर हे व्हायोलिन वादनामध्ये त्यांचे आदर्श होत. पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, किशोरी आमोणकर अशा दिग्गज कलाकारांचे त्यांना आशीर्वाद लाभले आणि त्यांचे संस्कार पं.अतुलकुमार उपाध्ये यांच्यावर झाले.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात १९८८ मध्ये पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली व्हायोलिनवादनाची संधी ही त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली. त्यापूर्वी इतक्या मोठय़ा समुदायासमोर कधी वादन केले नव्हते. या मैफिलीने त्यांना आत्मविश्वास दिला. पं.अतुलकुमार उपाध्ये यांनी सतारवादक उस्ताद शाहीद परवेज, बासरीवादक पं. रोणू मुजुमदार, सनईवादक दया शंकर, सारंगीवादक उस्ताद दिलशाद खाँ, सरोदवादक पं. तेजेंद्र मुजुमदार या कलाकारांसमवेत व्हायोलिनची जुगलबंदी केली आहे. त्यांची स्वत:ची पुण्यात व्हायोलिन अॅजकॅडमी आहे. ही व्हायोलिन अॅीकॅडमी सात दशकांपासून संगीताच्या प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. या व्हायोलिन अॅवकॅडमीच्या माध्यमातून नव्या पिढीचे कलाकार घडविण्याचे काम केले जाते. या सोबतच या व्हायोलिन अॅ.कॅडमीच्या माध्यमातून स्वरझंकार, स्वरमल्हार, स्वरदीपावली, स्वरमैफल अशा दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते.
आज पर्यत देशभरातील २५ शहरांत स्वरझंकार महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. अनेक वर्षे सातत्याने दर्जेदार अशा मैफिलींमधून उत्तमोत्तम कलाकार देणाऱ्या अतुलकुमार उपाध्ये यांनी ‘स्वरझंकार्स म्युझिक हब’ ची सुरुवात केली आहे.
व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये हे अतुलकुमार उपाध्ये यांचे सुपुत्र होत.
पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे संकेत स्थळ.